पुणे . सैन्यदलात २० वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्तीनंतर शासनाच्या सेवेत आलेल्या रोहिदास गावडे यांचे योगदान प्रेरणादायी असून त्यांच्याकडून कामाप्रती असलेली शिस्त व आरोग्याप्रती असलेली जागृतता विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अंगीकृत करावी; तसेच कामे करताना जिद्द, चिकाटीसह नवनवीन कल्पना स्वीकारताना त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी, असे प्रतिपादन उपसंचालक वर्षा पाटोळे यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालय येथे उपसंपादक रोहिदास गावडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित निरोप समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, माहिती अधिकारी सचिन गाढवे, सहायक संचालक जयंत कर्पे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
पाटोळे म्हणाल्या, रोहिदास गावडे यांनी भारतीय सैन्य दलातील सेवा बजावल्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत माहिती व जनसंपर्क विभागात सन 2008 मध्ये रुजू झाले. त्यांनी अतिशय कमी काळात विभागातील कामकाज जबाबदारीपूर्वक पार पाडले. त्यांच्या अंगी असलेला कामाप्रती जिद्द, बाणेदारपणा, कर्तव्यपारायणता, समयसूचकता आणि आरोग्यविषयी जागृतता वाखाण्याजोगी आहे. सैन्यसेवेतील त्यांची शिस्त कार्यालयीन कामकाजात नेहमी दिसून आली. नवीन क्षेत्रात काम करताना चिकाटीने नव्या क्षेत्राशी त्यांनी जुळवून घेतले, असे सांगून श्रीमती पाटोळे यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डॉ. ठाकूर म्हणाले, सैन्यदलातून राज्यसेवेत दाखल झालेल्या कर्मचारी आपल्याकरीता प्रेरणादायी असतात. त्यांनी सैन्यदलात देशाप्रती दिलेले योगदान कौतुकास्पद आहे, त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे. त्यांना सन्मानाची वागणूक देणे हे आपले कर्तव्य आहे, असेही डॉ. म्हणाले.
सत्कारमुर्ती गावडे म्हणाले, सैन्यदलातील योगदानानंतर पुन्हा देशाची सेवा करता आली हे आपले भाग्य समजतो. विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकारांची मोलाची साथ लाभली, यापुढेही देशसेवेकरीता कार्यरत राहीन, असे श्री.गावडे म्हणाले. यावेळी गाढवे, कर्पे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यकत केले.