महिलांना सक्षम करणारी यंदाची 18 वी भिमथडी जत्रा आजपासून पुण्यात – सुनंदा पवार
२०डिसेंबर ते २५ डिसेंबर दौराने आयोजित
पुणे. अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती ही संस्था गेली पाच दशके कृषी, शिक्षण, जलसंधारण, प्रशिक्षणे, महिला बचत गट, महिला सबलीकरण आशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्य करीत आहे. यापैकी एक सामाजिक उपक्रम म्हणजे ‘भीमथडी जत्रा’. महारष्ट्रात सन २००० पासून महिला बचत गटाची चळवळ सुरु झाली. तिला व्यापक स्वरूपही प्राप्त झाले, मात्र अल्पावधीतच महिलांनी बनविलेल्या उत्पादनांच्या बाजारपेठेचा प्रश्न उभा राहिला. तोच प्रश्न महिलांच्या या चळवळीच्या भविष्यातील वाटचालीला मोठा अडथळा बनला. नेमके याच काळात या साऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सौ. सुनंदा पवार यांना शहरी भागात जत्रा भरविण्याची संकल्पना सुचली. गेल्या १८ वर्षात महाराष्ट्रातील महिला अर्थकारणाला विशेष बळकटी देणारा प्रयोग प्रचंड यशस्वी झाला. भीमथडी जत्रेनंतर महाराष्ट्रात अनेक जत्रा भरवल्या गेल्या. त्या आजही सुरु आहेत. मात्र या सर्वांच्या जनक असलेल्या भीमथडी जत्रेचे हे मॉडेल महिलांसाठी दिशादर्शक ठरले.
यावर्षी अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फौंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या सयुंक्त विद्यमाने महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणारी भीमथडी जत्रा दिनांक २०डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२४ या कालावधीत कृषी महाविद्यालय मैदान शिवाजीनगर (सिंचननगर) पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. आज (२०/१२/२०२४) सायंकाळी ४ वाजता भीमथडी जत्रेचे स्पोन्स्ररर्स व यशस्वी महिला उत्पादकांच्या हस्ते या जत्रेचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ही जत्रा पुणेकरांसाठी सुरु होईल. दिनांक २१ डिसेंबर ते २५ डिसेंबर सकाळी १० ते सायंकाळी १० या वेळेत हे प्रदर्शन पुणेकरांना पाहता येणार आहे.
चूल आणि मूल यापुरते महिलांनी मर्यादित न रहाता बदलत्या जागात आपला व्यावहारिक दृष्टीकोन वाढविणे, महिलांना सर्वार्थाने आर्थिक दृष्ट्या शहाणे करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे हे ध्येय ठेवून ग्राहक व ग्रामीण भागातील बचत गटांच्या माध्यमातून उत्पादक बनलेल्या महिला यांच्यात दुवा साधण्यासाठी प्रदर्शन हे माध्यम उत्तम पर्याय वाटले आणि भीमथडी जत्रेचा जन्म झाला. ही जत्रा पुण्यात आयोजित करण्यामागे शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, आर्थिक अशा सर्व स्तराची बळकट पार्श्वभूमी असलेले पुणे सर्वात योग्य ठिकाण वाटले.
डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त “शेती” ही थीम घेऊन शेती व शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, जसे कि होलस्टेन फ्रिजीयन गाईंचे पालन, ड्रीप इरिगेशन, रेशीम उद्दोग, कुक्कुट पालन या सारखे शेती पूरक व्यवसाय त्या काळी अप्पासाहेबांनी सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचले. यावेळी भीमथडी जत्रा ही पद्मश्री अप्पासाहेब पवार यांना समर्पित असून या संकल्पनेवर आधारित अप्पासाहेबांच्या जीवनचरित्राचा पट या जत्रेत जागोजागी पाहायला मिळेल. या वर्षी भीमथडी जत्रेचे बैल जोडी व बैलगाडीच्या स्वरूपात असलेले भव्य प्रवेशद्वार हे थीमला साजेसे असेच आहे. पारंपारिक शेतीच्या जोडीला आधुनिक शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, शेतीशी निगडीत औजारे यांची मुख्य गेटवर सजावट असेल. बैल गाडी, झुली व गोंडे घातलेली खिलारी बैलजोडी आणि गवताने शेकारलेली कमान या मधून पुणेकरांना आतमध्ये प्रवेश मिळणार आहे.
भीमथडी प्रदर्शनामध्ये भौगोलिक मानांकन (जी. आय.) असलेले पिकांचे उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत, त्यामध्ये जालना जिल्ह्यातील दगडी ज्वारी , पुरंदर तालुक्यातील अंजीर, कोकणातील काजू, आंबा, कोकम, सांगली येथील हळद व त्याचे प्रक्रिया पदार्थ उपलब्ध असणार आहेत. याच्या व्यतिरिक्त, शेतकऱ्यांचे भौगोलिक मानांकन असलेली उत्पादने जसे की, गुळभेंडी ज्वारी, हुरडा, आजरा येथील तांदूळ, सांगली येथील सेंद्रिय गुळ, लाकडी घाणा तेल, परस बागेसाठी गावरान देशी बियाणे, चीया बी, फळबाग रोपे, व भाजीपाला रोपे इत्यादींचा समावेश असणार आहे.
यंदाची भीमथडी जत्रा १८ व्या वर्षात पदार्पण करत असून महाराष्ट्राची कलासंस्कृती (गोंधळी, पोतराज, भारुड, पाथरवट, बुरुड, केरसोनीवाले, नंदीबैल) पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहेत. ग्रामीण खाद्य महोत्सवात – ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनविलेल्या हस्तकला, उन्हाळी पदार्थ, चटण्या, मसाले, लोणची, कपडे, फळे, पालेभाज्या, कडधान्य इत्यादी उत्पादने विक्रीस उपलब्ध असतील. भरड धान्यामध्ये ज्वारीचा पिझ्झा बेस ब्रेड, खाकरा, भरडधान्याची पीठे, ज्वारीच्या लाह्या यासह भगर, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई इत्यादी भरड धान्य विक्रीसाठी उपलब्ध असतील.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या १८ पेक्षा जास्त जिल्ह्यासह देशातील इतर १२ राज्यामधून महिला बचत गट व महिला उद्योजिका यांना ३२५ स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत. या भीमथडी जत्रेत महाराष्ट्रासह परराज्यातील महिलांचे निवडक उत्पादनांचे सिलेक्ट दालन, आपासाहेब पवार दालन, भौगोलिक मानांकन दालन, पॅकिंग दालन, शेतकरी उत्पादक कंपन्या व मधुमक्षिका पालन, पर्यावरण वाचवा संदेश, अशी वेगवेगळी दालने व शेतीविषयक माहितीचे वैविध्यपूर्ण स्टॉल आहेत.
खाद्य विभागात खापरावरील पुरण पोळी, खान्देशी मांडे, जळगावच्या वांग्याचे भरीत, मासवडी, उकडीचे मोदक, विदर्भाची स्पेशल लंबी रोटी व वडा भात यांसह नॉन व्हेज विभागात नेहमी प्रमाणे कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, मालवणी फिश थाळी, राशिनचे सुप्रसिद्ध मटन, चिकन व मटन वडे असे विविध खाद्य पदार्थ पुणेकरांसाठी उपलब्ध असतील. दिनांक २५ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या भीमथडी जत्रेला अधिकाधिक पुणेकरांनी भेट द्यावी व ग्रामीण भागातील महिला उत्पादकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या प्रयत्नाला हातभार लावावा असे पुणेकरांना आवाहन करण्यात येत आहे.