पुणेमराठी

कोथरुड मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यांचे प्रश्न जलदगतीने मार्गी लावा!

रस्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारकडून ही निधी आणणार - नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

Spread the love

पुणे. कोथरुड विधानसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी विकास आराखड्यातील रस्त्यांचे प्रश्न जलदगतीने मार्गी लावावेत, असे निर्देश नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले. तसेच, रस्त्यांच्या विकासासाठी राज्य सरकारकडूनही निधी आणू, अशी ग्वाही नामदार पाटील यांनी दिली. नामदार पाटील यांनी आज कोथरुड विधानसभा मतदारसंघातील मिसिंग लिंकचा आढावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून घेऊन; रस्ते विकासामध्ये येणाऱ्या अडचणींची सविस्तर माहिती घेतली.

यावेळी आमदार योगेश टिळेकर, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, वाहतूक पोलीस निरीक्षक जावेद पठाण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम, मालमत्ता महेश पाटील, दिलीप काळे, गिरीश दाबकेकर, विजय नायकर, अविनाश संकपाळ, राऊत, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष संदीप बुटाला, उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, दिलीप वेडे-पाटील, शिवरामपंत मेंगडे, लहू बालवडकर, राहुल कोकाटे यांच्या सह भाजपचे पदाधिकारी आणि महापालिकेचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी कोथरूड मधील रस्त्यांच्या कामाचे सादरीकरण केले. यामध्ये पुणे शहरातील ३३ पैकी १५ प्रमुख रस्त्यांचे काम हाती घेतले असून याला ‘मिशन १५’ असे नाव दिले असल्याचे सांगितले. यामध्ये रस्त्यांचे खड्डे बुजवणे, चेंबर समपातळी करणे, रस्ते सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजना करणे, रोड लेन, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक नियमन फलक लावणे, पदपथ दुरुस्ती, अतिक्रमण हटविणे, चौक सुशोभिकरण व स्वच्छता आदी बाबींवर काम सुरु असल्याची माहिती दिली. तसेच मिशन १५ मध्ये कोथरूड मधील प्रमुख चार रस्त्यांचा ही समावेश असल्याची माहिती दिली.

त्यावर नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी इतर मिसिंग लिंकबाबत माहिती देण्याची सूचना केली. त्यावर २६ मिसिंग लिंक असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामधील सात प्रमुख असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.त्यावर नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सदर रस्त्याच्या विकासामध्ये कोणत्या अडचणी येत असल्याचा सवाल केला.

पावसकर यांनी मिसिंग लिंकचे काम पूर्ण करण्यात जमीन अधिग्रहणामध्ये अडथळे येत असल्याचे सांगितले. त्यावर नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी नागरिकांशी समन्वय आणि संवाद साधून सदर विषय जलदगतीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. तसेच, शहरातील रस्ते विकासासाठी अतिजटील समस्यांचा अहवाल तयार करावा. त्या समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सोबत बैठक घेऊन मार्ग काढू, असेही आश्वस्त केले.

दरम्यान, ‘मिशन १५’ अंतर्गत रस्ते विकासासाठी एकूण ८७० कोटी खर्च अपेक्षित असून कोथरुड विधानसभा मतदारसंघातील रस्ते विकासासाठी ३२५ कोटी लागणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली . त्यापैकी १५० कोटी राज्य सरकारकडून आणण्यासाठी पाठपुरावा करु. उर्वरित निधी महापालिकेने द्यावा असे निर्देश यावेळी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button