“यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची परंपरा जपणे आपली जबाबदारी” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
यशवंतराव चव्हाण यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन कार्यक्रम

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आज सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आला. यावेळी त्यांना अभिवादन करताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “यशवंतराव चव्हाण यांनी बेरजेच्या राजकारणाची संकल्पना रुजवली. मतभेद असले तरी समाजकारणाला महत्त्व द्यावे, अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्या विचारांची परंपरा जपणे ही आपली जबाबदारी आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती राम शिंदे आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या ऊपस्थित होते.
पुढे, त्यांच्या कार्याचा गौरव करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम होण्यासाठी मोठे योगदान दिले. सहकार, शेती, संस्कृती, साहित्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी भरीव कार्य केले.
शाळेत असताना आम्ही यशवंतराव चव्हाण यांना पाहिलं होतं. महाराष्ट्र गीताच्या निमित्ताने त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली. ते नेहमी म्हणायचे की राजकारण हे सर्वांचं मिळून असतं, मात्र समाजकारण अधिक महत्त्वाचं आहे. मतभिन्नता असली तरी सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेला जपणं आवश्यक आहे.”
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित अन्य मान्यवरांनी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करत त्यांच्या योगदानाला स्मरले.