पूरग्रस्तांच्या सेवेसाठी नामदार चंद्रकांत पाटील कार्यतत्परता

पूरग्रस्त भागांच्या स्वच्छतेसह बाधितांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पुणे.कोथरुड, बाणेर, बालेवाडी आणि सोमेश्वर वाडी मधील पूरग्रस्त भागांच्या सेवेसाठी पहिल्या दिवसापासून नामदार चंद्रकांतदादा पाटील कार्यतत्पर असून; पूर ओसरल्यानंतर ही पूरग्रस्त भागांची स्वच्छता आणि बाधितांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे पूरबाधितांना दिलासा मिळाला आहे.
बुधवारी मध्यरात्रीपासून पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीला महापूर आला. अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदी काठच्या नागरिकांना तातडीने स्थलांतरित व्हावे लागले. यावेळी आपल्या डोळ्यासमोर घराचे नुकसान होताना पाहून अनेक महिलांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.
कोथरुडमधील रजपूत वीटभट्टी, खिल्लारे वाडी, डीपी रोड येथील शाहू वस्ती या भागांना पूराचा मोठा फटका बसला. तर बाणेर बालेवाडी भागातून वाहणाऱ्या रामनदीला पूर आला. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पूर आलेल्या क्षणापासून इथल्या नागरिकांच्या मदतीला धावून जात, सर्वप्रकारची व्यवस्था केली.
रजपूत वीटभट्टी आणि खिल्लारे वाडी परिसरातील बाधितांना एरंडवणे भागातील अनुसूयाबाई खिल्लारे शाळेत स्थलांतरित करुन, त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. तर डीपी रोड येथील शाहू वस्तीमधील बाधितांना ज्ञानदा प्रशालेत स्थलांतरित करुन त्यांचीही राहण्याची व्यवस्था केली. तसेच, शुक्रवारी सकाळी पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून बाधितांना धीर देत सर्व शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यासोबतच; लोकसहभागातून नागरिकांना मदत उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती.
त्यानुसार शुक्रवारी दुपारी पुराचे पाणी ओसरल्यानंतर पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल साचला होता. तसेच, घरातील सर्व जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले होते. त्यामुळे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी जेटिंग आणि मजुरांच्या मदतीने घरांची स्वच्छता करुन दिली. तसेच, लोकसहभागातून बाधितांना एक महिना पुरेल एवढे धान्य आणि जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या. संकटकाळात पालक म्हणून चंद्रकांतदादा पाटील धावून आल्याने पूरबाधितांना मोठा दिलासा मिळाला आहे.