
पुणे. दिवाळी सणानिमित्त पुणे शहरातील मध्यवर्ती भागात बाजारपेठांमध्ये खरेदीकरीता ग्राहकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता शहरातील वाहतूक सुरळीत रहावी म्हणून ५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
याअंतर्गत शिवाजीनगरवरून शिवाजी रोडने जाणारी चारचाकी वाहने स. गो. बर्वे चौकातून जाणारी वाहतूक जंगली महाराज रस्ता- टिळक चौक या पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.
स्वारगेटवरून बाजीराव रोडने शिवाजीनगरकडे पुरम चौक मार्गे जाणारी चारचाकी वाहने पुरम चौकातून डावीकडे वळून टिळक रोडने एस. पी. कॉलेज अलका चौक मार्गे इच्छितस्थळी जातील. आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल. ही वाहने बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील.
फुटका बुरूज वरून जोगेश्वरी चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल. त्यासाठी इच्छितस्थळी जाण्यासाठी शिवाजी रोडवरुन सरळ पुढे जाणारा पर्यायी मार्ग राहील. शनिपार चौकाकडून तसेच कुमठेकर रोडवरून मंडईकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल. याकरिता पर्यायी मार्ग म्हणून बाजीराव रोडने सरळ पुढे जाता येईल.
*पार्किंग व्यवस्था*
दिवाळीसणानिमित्त बाजारपेठेत बाजीराव रोड, शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड व मंडई या भागात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने बाबू गेनू पार्किंग, मिसाळ पार्किंग, हमालवाडा पार्किंग व साने वाहनतळ याठिकाणी पार्क करावीत, अशा सूचना वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी दिल्या आहेत.