
पुणे . मुळा-मुठा सह्याद्रीच्या लेकी…वुई लव्ह मुळा-मुठा…ध्यास स्वच्छतेचा, ध्यास प्रगतीचा…नद्या वाचवा, जीवन वाचवा…असे फलक हातात घेत घोषणांसह महाविद्यालयीन युवक-युवती, शालेय विद्यार्थी आणि पुणेकरांनी मुठा परिसर स्वच्छतेने व्हॅलेंटाईन डे साजरा केला. एक हजारहून अधिक पुणेकरांनी मुठा नदी पात्रात एकत्र येत माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन उपक्रमात सहभाग घेत मुठा नदी विषयी प्रेम व कृतज्ञता व्यक्त केली.
वर्शिप अर्थ फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणेकर नदी परिसर स्वच्छ करून ‘माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन’ हा उपक्रम राबविण्याकरिता भिडे पूल परिसरात एकत्र आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री राजकुमार सिंग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, अभिनेते प्रविण तरडे, प्रशासकीय अधिकारी आशा राऊत, निखील देशमुख, आशिष शेटे, अनिल सातव, नितीन देशपांडे, वर्शिप अर्थ फाउंडेशनचे संस्थापक पराग मते, सह संस्थापक राज देशमुख, व्यवस्थापन टीममधून आम्रपाली चव्हाण, समीर पौलस्ते, सुरज शिराळे, विद्यार्थी प्रतिनिधी अक्षना कांबळे, सानिका दळवी, यश आगवणे यांसह विविध धर्मांचे धर्मगुरु देखील उपस्थित होते.
मुळा-मुठा नदी स्वच्छतेविषयी यावेळी उपस्थितांनी शपथ घेतली. यामध्ये जपान, ब्राझील, रशिया, श्रीलंका या देशातील पर्यावरणप्रेमींनी देखील सहभाग घेतला. पर्यावरण रक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल नीलय उपाध्याय यांना यावेळी मुळा-मुठा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राजकुमार सिंग म्हणाले, कोणत्याही नदीला मुक्तपणे प्रवाहित होऊ दिले नाही, तर संपूर्ण पर्यावरणाचा -हास होऊ शकतो. वाढते शहरीकरण आणि मानवी अतिक्रमण यामुळे नदी विषमय होत आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने याविषयी आत्मपरिक्षण करायला हवे. मुळा-मुठा नदी नीट आणि सुंदर ठेवणे, ही पुणेकरांची जबाबदारी आहे. यासाठी आज पुणेकर एकत्र आल्याचे चित्र प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.पराग काळकर म्हणाले, मुळा-मुठा ही पुण्याची वाहिनी आहे. नदीच्या काठाने माणसाचे जीवन विकसित झाले आहे. नदी हा मानवी जीवनाचा आवश्यक भाग असून पाण्यातील प्रदूषणाने अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. आपण एक पाऊल पुणे टाकून नदी सुधार आणि आरोग्याच्या दृष्टीने टाकायला हवे.
राज देशमुख म्हणाले, ‘वसुधैव कुटुंबकम’ या उक्ती प्रमाणे संपूर्ण मानवजाती एक परिवार असून या पृथ्वीतलावरील जल, मृदा, वायू, वनस्पती, वन औषधी जीव जंतू इत्यादी सर्व बाबीचा आपण मनुष्य म्हणून उपभोग घेतो. त्यामुळे त्याचे रक्षण व संवर्धन करायची जबाबदारी माणूस म्हणून सर्वांची आहे. यासाठीच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात नदीच्या बाजूचा परिसर स्वच्छ करून जसे सुका कचरा असेल प्लास्टिक असेल ही स्वच्छता मोहीम घेण्यात आली.
यावेळी वर्शिप अर्थ फाउंडेशन कडून विद्यार्थ्यांसाठी २ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी वर्शिप अर्थ फाउंडेशन ने नाविन्यपूर्ण उपाय सुचवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. या शिष्यवृत्तीचा उद्देश विद्यार्थी वर्गाला पर्यावरणपूरक संकल्पना शोधण्यास आणि त्यावर कार्य करण्यास प्रेरित करणे हा आहे.