घोरात्कष्टात स्तोत्रपठणातून दत्तचरणी मंत्रघोष
दत्तजयंती उत्सवानिमित्त श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवारतर्फे आयोजन
पुणे .श्रीपाद वल्लभ दिगंबरा…. नर्मदे हर हर… च्या निनादात तसेच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त… च्या नामघोषाने लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा परिसर दुमदुमून गेला. तसेच प.पू.वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या घोरात्कष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण शेकडो दत्तभक्तांनी एकत्रितपणे केले.
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवारतर्फे १२७ व्या दत्तजयंती उत्सवाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील दत्तमंदिरासमोरील श्री दत्त कलामंच उत्सव मंडपात करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख प.पू. बाबा महाराज तराणेकर (इंदोर), तेजस तराणेकर, भाग्यश्री तराणेकर आदी उपस्थित होते.
या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, कार्यकारी विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, खजिनदार अॅड. रजनी उकरंडे, विश्वस्त अॅड. शिवराज कदम जहागिरदार, डॉ. पराग काळकर, युवराज गाडवे, सुनिल रुकारी व्यासपीठावर उपस्थित होते. दत्तमंदिर उत्सवाचे यंदा १२७ वे वर्ष असून दत्तजयंती उत्सवाचा प्रारंभ दरवर्षी या सामूहिक स्तोत्र पठणाने होतो. घोरात्कष्टात मंत्र पठणातून लोकमंगल व्हावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
प.पू.बाबा महाराज तराणेकर म्हणाले, दत्तजयंती उत्सवाची सुरुवात सामुहिक घोरात्कष्टात पठणातून फक्त पुण्यात लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरातच होते. सध्याच्या वैचारिक प्रदूषणावर घोरात्कष्टात स्तोत्र हा उत्तम उपाय आहे. घोरात्कष्टात जपयज्ञ हा एक उपचार असून आज पुण्यासह जगभरातील असंख्य भाविकांनी यामध्ये ऑनलाईन पद्धतीने देखील सहभाग घेतल्याचा आनंद आहे.
राजेंद्र बलकवडे म्हणाले, घोरात्कष्टात हे लोकमंगल वर्धक स्तोत्राचा अनेक दत्तभक्तांच्या नित्य उपासनेत अंतर्भाव आढळतो. दत्त जयंतीच्या निमित्ताने सर्व देवता उपासक एकत्र यावे आणि सामुहिक उपासना व्हावी, याकरीता स्तोत्र पठण करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी समाजसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते यांचा तारणेकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. पराग काळकर यांनी आभार मानले तर अॅड.शिवराज कदम जहागिरदार यांनी सूत्रसंचालन केले.