![](https://janbharatsamchar.com/wp-content/uploads/2025/01/मंत्री-अतुल-सावे--780x470.jpeg)
पुणे. महात्मा ज्योतिबा फुले मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराचे इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते रामकृष्ण मोरे सभागृहात शनिवारी (३ जानेवारी) वितरण करण्यात आले. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या २१ महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार तथा अखिल भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ आमदार शंकर जगताप, महात्मा ज्योतीबा फुले मंडळाचे अध्यक्ष हणमंत माळी, पिंपरी चिंचवड शहरातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, उद्योजक व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री सावे म्हणाले, वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा मानसन्मान केला पाहिजे. चांगलं काम करणाऱ्यांचा सन्मान केल्यास इतरांना प्रेरणा मिळते. ओबीसी समाजातील प्रत्येक घटकाला लाभ मिळावा यासाठी शासन पाठीशी असून गेल्या अडीच वर्षात इतर मागास बहुजन विभागामार्फत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. महाज्योतीच्या माध्यमातून अनेक कामे झाली आहेत. ५६ ठिकाणी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्यात आली असून ७२ वसतिगृह सुरू करण्याबाबत आराखडा तयार करण्यात आला आहे. आरण देवस्थानला ‘अ’ वर्ग दर्जा आणि १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. भक्तनिवासचे कामही सुरू आहे. भिडे वाड्याच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला असून त्या कामाला गती देण्यात आली आहे. नायगाव येथे दहा एकर जागेमध्ये स्मारक आणि मुलींसाठी प्रशिक्षण सेंटर सुरू करण्यात येणार आहे असेही ते म्हणाले.
भुजबळ म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी जातिभेद करू नये हा संदेश त्याकाळी दिला. तर शिक्षणासोबतच महिला सबलीकरणाचं पहिलं पाऊल सावित्रीबाईंनी टाकलं. फुले दांपत्याने अंधश्रद्धेच्या विरोधात काम केले. ज्योतिबांनी लिहिलेले ‘शेतकऱ्याचा आसूड’ व ‘गुलामगिरी’ ही पुस्तके एकदा तरी वाचावीत. सामाजिक क्रांती घडविणाऱ्या फुले दांपत्याच्या जीवनावरील ‘सत्यशोधक’ हा चित्रपट अवश्य पहावा असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले, नायगाव येथे संरक्षण प्रबोधिनी सुरू करण्यात येणार आहे त्यासाठी १८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भिडे वाड्याच्या कामाला आता गती मिळाली आहे. नवीन वसतिगृह सुरू करण्यात आले असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार शंकर जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २१ सावित्रीच्या लेकींचा महिलाभूषण,आदर्श माता, कार्यक्षम अधिकारी, समाजभूषण, आध्यात्मभूषण, आदर्श मुख्याध्यापिका, कायदाभूषण, कर्तव्यभूषण, आदर्श शिक्षिका, साहित्यभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.