ताजा खबरपुणेमराठीव्यापार

100 दिवसाच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडी सोडविण्याच्या उपाययोजनांचा समावेश करा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Spread the love

पुणे.  पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, नागरिकांना विश्वासात घेत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. यासंबंधात आलेल्या सूचनाही विचारात घ्यावात, 100 दिवसाच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडी सोडविण्याच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

विधानभवन येथे आयोजित वाहतूक समस्येबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, शरद सोनवणे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, पीएमपीएलच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता सर्वांनी वाहतूक कोंडी कमी करण्याकरीता पुढाकार घ्यावा. रस्त्यावरील अतिक्रमणाची ठिकाणे निश्चित करुन महानगरपालिकेने ते अतिक्रमण तात्काळ काढावेत, रस्ते आणि वाहतुकीच्या प्रकल्पांसाठी आवश्यक भूसंपादनाच्या कार्यवाहीला गती द्यावी. याकरिता आवश्यकतेप्रमाणे पोलीस विभागाची मदत घ्यावी. याकरिता अत्याधुनिक साधने, कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या (एआय) नवनवीन तंत्रज्ञानाची तसेच या विषयाशी निगडीत तज्ज्ञ व्यक्तींची मदत घ्यावी. भूसंपादनाची प्रलंबित असलेली न्यायालयीन प्रकरणे मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी.

पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता पुणे महागरपालिकेकडे असलेली वाहतूक सिग्नल यंत्रणा पोलीस आयुक्तालयाकडे हस्तातरीत करावी. नवले पुलाचे प्रलंबित कामे गतीने पूर्ण करावीत. स्मार्ट सिटी कार्यालयातील वाहतूक व्यवस्थापन यंत्रणेंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा पोलीस आयुक्ताकडे वर्ग करावी, अशाही सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

अहिल्यानगर व सोलापूर महामार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रव्हॅल्स थांब्याकरीता जागा निश्चित कराव्यात. सुरक्षितेतच्यादृष्टीने त्याठिकाणी सीसीटिव्ही, वीज आणि शौचालय, पिण्याचे पाण्याची व्यवस्था करावी.

चाकण परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याकरीता पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पोलीस आयुक्तालय आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने मिळून कार्यवाही करावी. वाहतूक सुरळीत राहण्याच्यादृष्टीने पायाभूत सुविधा उभाराव्यात. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही श्री. पवार म्हणाले.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ, खासदार श्रीमती कुलकर्णी यांनी शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासोबत अनधिकृत अतिक्रमण काढण्याची सूचना केली. आमदार श्री. तापकीर, श्री. शिवतारे, श्री. पठारे यांनी वाहतूक कोंडी दूर करण्याबाबत सूचना केल्या. हर्डीकर म्हणाले, शहरातील वाहतूकीची समस्या सोडविण्याकरीता मेट्रो पोहचू शकत नाही, अशा ठिकाणी पीएमपीएलच्या बसेसच्या फेऱ्यामध्ये वाढ करावी लागेल. नागरिकांना परवडेल असे भाडेदरात आकारणी करावी लागेल, असे श्री. हर्डीकर म्हणाले.

पोलीस आयुक्त  कुमार म्हणाले, आगामी काळात होणारी लोकसंख्येतील वाढ व रस्त्यांची रुंदी विचारात घेता शहरात वाघोली, सोलापूर मार्गासह विविध भागात थांबणाऱ्या ट्रॅव्हल्सकरीता धोरण राबविणे गरजेचे आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्यावर भर असल्याचे श्री. कुमार यांनी सांगितले.

डॉ. भोसले म्हणाले, पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडण्याकरीता बैठकीत दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. याकरीता सर्व संबंधित यंत्रणेला विचारात घेवून प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात येतील. म्हसे म्हणाले, वाहतूकीच्यादृष्टीने पीएमआरडीएच्यावतीने शहर परिसरात मल्टीमोडल हब विकास आराखड्याअंतर्गत कामे सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शेखर सिंह आणि अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी वाहतूक कोंडी तसेच ती सोडविण्याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सादरीकरण करुन माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button