व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी साजरा होणार ‘माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन
वर्शिप अर्थ फाउंडेशन च्या वतीने दि. १४ फेब्रुवारी रोजी आयोजन

हजारो युवक व विद्यार्थी व्यक्त करणार मुठा नदी विषयी कृतज्ञता
पुणे . वर्शिप अर्थ फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही १४ फेब्रुवारी रोजी हजारो युवक व विद्यार्थी नदी परिसर स्वच्छ करून ‘माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन’ हा उपक्रम राबवून पर्यावरणाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणार आहेत. भिडे पूल येथे शुक्रवारी सकाळी ७ वाजता हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती वर्शिप अर्थ फाउंडेशनचे सह संस्थापक राज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वर्शिप अर्थ फाउंडेशन तर्फे व्यवस्थापन टीममधून आम्रपाली चव्हाण, समीर पौलस्ते, सुरज शिराळे, विद्यार्थी प्रतिनिधी अक्षना कांबळे, सानिका दळवी आदी उपस्थित होते.
राज देशमुख म्हणाले, ‘वसुधैव कुटुंबकम’ या उक्ती प्रमाणे संपूर्ण मानवजाती एक परिवार असून या पृथ्वीतलावरील जल, मृदा, वायू, वनस्पती, वन औषधी जीव जंतू इत्यादी सर्व बाबीचा आपण मनुष्य म्हणून उपभोग घेतो. त्यामुळे त्याचे रक्षण व संवर्धन करायची जबाबदारी माणूस म्हणून सर्वांची आहे. यासाठीच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात नदीच्या बाजूचा परिसर स्वच्छ करून जसे सुका कचरा असेल प्लास्टिक असेल ही स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे.
तसेच विद्यार्थ्यांची रॅली आणि नदीला मानवंदना देत कार्यक्रम करण्यात येणार आहे. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून अनेक महाविद्यालय व शाळेतील स्वयंसेवक उपस्थित राहणार आहे. वर्शिप अर्थ फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था असून पर्यावरण, मतदान जनजागृती, महिला व युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार देणे, सामाजिक सलोखा राखणे इत्यादी सामाजिक कामे संस्थेच्या वतीने केली जातात.