
आळंदी . राज्यशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यातील १ ते १५ वर्षाखालील बालकांना मार्च २०२५ पासून जपानीज एन्सेफलायटीस लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत तालुका खेड मधील सर्व ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांत जपानीज एन्सेफलायटीस लसीकरण मोहीमेस यशस्वीपणे सुरुवात करण्यात आली.१ लाख ७ हजार ९३७ बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
जपानीज एन्सेफलायटीस हा आजार १५ वर्षाखालील बालकांमध्ये आढळून येतो. आशिया खंडात अक्युट एन्सेफलायटीस सिन्ड्रोममुळे हा आजार होतो. या आजारात सुमारे ३० टक्के रुग्ण मृत्युमुखी पडतात किंवा त्या रुग्णांमध्ये दीर्घकालीन न्यूरोलॉजीकल अक्षमता आढळून येते. त्यामुळे सर्व अंगणवाडी केंद्र, खाजगी व शासकीय शाळा अंतर्गत १ वर्ष ते १५ वर्षाखालील सर्व बालकांचे लसीकरण करण्यात येत आहे. खेड तालुक्यातील या मोहिमेत एकुण १ लाख ७ हजार ९३७ एवढ्या बालकांना लस देणेचे नियोजन आहे. १० मार्च पासुन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ विलास माने यांचे मार्गदर्शन नुसार लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. ११ मार्च अखेर ६ हजार ४७० बालकांना या लसीची मात्रा देण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ सचिन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहिम राबविण्यात येत आहे. खेड तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी ,शिक्षक वृंद आणि आरोग्य कर्मचारी व आशा ,अंगणवाडी सेविका यांनी या मोहिमेत हिरीरिने सहभाग घेतला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी सांगितले.