पुणे .पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विधानसभा मतदारसंघात (अ.जा.) मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी स्वीप पथकामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मतदार जागरुकता व सहभाग कार्यक्रम (SVEEP) अंतर्गत मतदारसंघाच्या विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये मतदानाचा हक्क बजावणेबाबत विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्रे भरुन घेण्यात आली.
‘मतदार जागरुकता व सहभाग कार्यक्रम’ अंतर्गत मतदारसंघातील वानवडी येथील हरीभाऊ गिरमे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, महादजी शिंदे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, महादजी शिंदे प्राथमिक विद्यालय, विठ्ठलराव शिवरकर विद्यालय, श्रीमती शांताबाई ढोले पाटील माध्यमिक विद्यालय, महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालय ( उर्दु, मराठी व इंग्रजी माध्यम), एस. एस. पी. एम. एस. सोसायटीची माध्यमिक शाळा, सेंट मिराज इंग्लिश मिडियम सेकंडरी स्कूल (इंग्रजी संकल्पपत्रे) अशा विविध शाळा तसेच महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना संकल्पपत्रांच्या जवळजवळ चार हजार प्रतींचे वाटप करण्यात आले. या संकल्पपत्रांद्वारे यांच्या घरामधील आई-वडिल, बहीण भाऊ आजी आजोबा तसेच कुटूंबातील इतर सदस्य मतदारांना भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले
या संकल्पपत्रांमार्फत शाळकरी मुलांना मतदानाचे महत्व पटवून देऊन त्यांच्या घरामधील सर्व मतदारांकडून मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन भारतीय संविधानाने अनुच्छेद क्र. ३२६ अन्वये नागरीकांना दिलेला मतदानाचा हक्क बजावू या आशयाची संकल्प पत्रे भरून घेण्यात आली. या मोहिमेला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ (अ.जा.) चे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथकाने पुढाकार घेतला.