चुनावताजा खबरपुणेब्रेकिंग न्यूज़मराठी समाचार

हिंदुराष्ट्र ही संकल्पना संविधान विरोधी – निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांचे मत

विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने संविधान दिना निमित्त आयोजित भारतीय संविधान विचार संमेलनाचे उद्घाटन

Spread the love

 

पुणे . महाराष्ट्रात नुकत्याच  विधानसभा निवडणुका पार पडल्या, यामध्ये संविधान हा शब्द सत्ताधारी आणि विरिधाक या दोघांच्याही प्रचाराचा प्रमुख भाग होता. मात्र संविधान – संविधान करणाऱ्या या दोन्ही बाजूच्या लोकांनी खरेच संविधान जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का?  पूर्वीच्या काळी भेदाभेद करणारी संस्कृती चांगली कशी असेल ? असे सवाल उपस्थित करत हिंदुराष्ट्र ही संकल्पना भारतीय संविधान विरोधी असल्याचे मत निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी व्यक्त केले.

विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने संविधान दिना निमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित  ‘भारतीय संविधान विचार संमेलन’ च्या उद्घाटन प्रसंगी न्या. ठिपसे बोलत होते. याप्रसंगी  निवृत्त पोलिस महासंचालक सुधाकर सुराडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते,  डॉ. सुरेंद्र जोंधळे (मुंबई) ,इरफान इंजिनिअर ( मुंबई), समाजवादी जन परिषदेच्या अखिल भारतीय अध्यक्षा ॲड. निशा शिवूरकर, ह.भ.प . श्यामसुंदर महाराज सोनार, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे, संमेलनाचे मुख्य आयोजक परशुराम वाडेकर, संमेलनाच्या निमंत्रक, पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, दीपक म्हस्के आदि मान्यवर उपस्थित होते.  ‘भारतीय संविधानाचे ७५ वर्षे .. विकास व वाटचाल’ हा या संमेलनाचा विषय आहे.

पुढे बोलताना न्या. ठिपसे म्हणाले, भारतीय संविधान आपला देश  धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचे म्हणते याचा अर्थ कोणत्याही धर्माला इथे संविधाना पेक्षा जास्त महत्व नाही. आज हिंदुराष्ट्र ही संकल्पना मांडणारे जुनी संस्कृती चांगली असल्याचे सांगत आहेत परंतु त्याकाळी असलेली विषमता, भेदाभेद याचे समर्थन होऊ शकत नाही हे वास्तव आहे. आज हिदूराष्ट्र चा नारा देणारे सुद्धा संविधान – संविधान चा उदो उदो करताना दिसत  आहेत याचाच अर्थ ज्यांना ते नकोय किंवा बदलायचे आहे ते संविधान प्रेम असल्याचा आव आणत आहेत अशी टीका त्यांनी केली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सांगणारे, चळवळीतील काही नेते, कार्यकर्तेही हिदूराष्ट्रवाल्यांच्या पोस्टरवर झळकत असल्याची खंत न्या. ठिपसे यांनी व्यक्त केली.

आपल्या देशात लोकशाही आहे, लोकशाहीचा अर्थ फक्त बहुमत असा होत नसल्याचे सांगत न्या. ठिपसे म्हणाले, हुकूमशहाला सुद्धा बहुमत लागते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हिटलर आहे. फक्त बहुमत म्हणजे न्याय, समता,  बंधुता आणि स्वातंत्र्य नाही. लोकशाही मध्ये या चार गोष्टी असतात तसेच तिथे अल्पसंख्यांकांचे संरक्षण सुद्धा आवश्यक असते. फक्त बाबसाहेबांचा जयजयकार आणि संविधानाचा उदो उदो न करता संविधानातील विचार रुजविण्याचा, अंगिकारण्याचा प्रयत्न गरजेचे असल्याचे न्या. ठिपसे यांनी नमूद केले.

ह.भ.प . श्यामसुंदर महाराज सोन्नर म्हणाले, भारतीय संविधान हे संताच्या विचारांवर आधारलेले आहे. आज काही महाराज देशाला हिंदूराष्ट्र करण्याची मागणी करत आहेत,  हे महाराज देशाच्या आणि संतांच्या विरोधात आहेत, कारण  स्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधुता ही संतांची शिकवण आहे आणि भारतीय संविधान सुद्धा आपल्याला हेच शिकवते. यामुळे संविधान संरक्षण विषयी जागरूकता करण्यासाठी मी पत्रकारिता सोडून वारकरी मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.

इरफान इंजिनिअर म्हणाले, आपल्याकडे पूर्वी राजेशाही होती पण संविधानाने ती व्यवस्था पूर्णपणे पलटवली. मात्र आता जाती धर्मांमध्ये भीती पसरवली जात आहे. अल्पसंख्यांक विरोधी वातावरण तयार केले जात आहे. आजचे मनुवादी सरकार कायद्याचे हत्यार करून जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करत आहे.

जोंधळे म्हणाले, आज आपल्या हाती असलेले संविधान हे परिपूर्ण आहे. मात्र ज्या ज्या वेळी यातील मुद्दे हे अव्यवहार्य वाटले त्या त्या वेळी  घटनेच्या चौकटीत राहून या संविधानामध्ये बदल करण्यात आले. त्यामुळे आजची भारतीय राज्यघटना ही काळसंवादी आहे. प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद यामध्ये आहे. तर उद्देशीका ही भारतीय राज्यघटनेचे  नैतिक बलस्थान आहे.

संविधानातील मूल्ये नष्ट करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याची टीका  ॲड. निशा शिवूरकर यांनी केली. ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी ही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात निवृत्त पोलिस महासंचालक सुधाकर सुराडकर म्हणाले, आज संविधान धोक्यात आहे याचा अर्थ आपले अधिकार धोक्यात आहेत, मात्र याची आपल्याला जाणीव नाही. संविधानाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी पोलिस आणि न्यायपालिकेला त्यांची कर्तव्य करायला भाग पाडा. आज आपली जी वाटचाल सुरू आहे ती पोलीसराज कडे आहे. जे आपल्या देशाला घातक आहे. त्यामुळे त्यांच्यावर अंकुश ठेवायचा असेल तर तो कायदेशीर मार्गानेच ठेवला पाहिजे. त्यामुळे बाबासाहेबांच्या शिकवणी प्रमाणे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना परशुराम वाडेकर म्हणाले, लोकसभा – विधानसभा निवडणूकीत संविधान – संविधान बोलणारे राजकीय पक्ष आज संविधान दिनाला मात्र झोपलेले आहेत. भारतीय संविधान म्हणजेच विकास आहे हे लक्षात घेऊन आपल्या राज्यकर्त्यांनी वागायला पाहिजे मात्र दुर्दैवाने असे झाले नाही आता होतानाही दिसत नाही. आजही आंबेडकरी चळवळीतील लोक संविधानवर काम करत आहेत, बोलत आहेत इतरांनीही यावर काम केले पाहिजे त्याशिवाय संविधान खऱ्या अर्थाने तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणार नाही.

संमेलनाची सुरुवात सुप्रसिद्ध गायक विजय कावळे आणि पार्टी यांच्या  ‘संविधानाचा जलसा’ या गाण्यांच्या कार्यक्रमाणे झाली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button