फडणवीस व भाजपाने पंडित नेहरूंच्या नावाने फेक नेरेटिव्ह पसरवू नये
उद्यापासून राज्यभर ‘जोडे मारो’ आंदोलन: नाना पटोले
जे काम मुघल करु शकले नाहीत ते भाजपाच्या बेईमान लोकांनी केले; धमकीच्या स्वरात मागितलेली माफी मंजूर नाही: पवन खेरा
१९ व्या शतकात इतिहास कोण लिहित होते हे सर्वांना माहित, योग्य व्यक्तींनी लिहिलेलाच इतिहास वाचा: छत्रपती शाहू महाराज
मुंबई. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करुन भाजपा सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवली आहे. महाराज आपले दैवत आहेत, भाजपाने त्यांचा धडधडीत अपमान केला आहे, या अपमानाविरोधात जोडे मारो आंदोलन आयोजित केले असताना शिवद्रोही व्यवस्थेने विरोध केला, परवानगी नाकारली. आता काँग्रेसनेच महाराजांचा अवमान केल्याचा फेक नेरेटिव्ह देवेंद्र फडणवीस व भाजपा पसरवत आहे, फेक नॅरेटिव्ह पसरवणे हा भाजपाचा डिएनए आहे, असे प्रत्युत्तर देत आज मुंबईत जोडे मारो आंदोलन करण्यात आले असून उद्या २ तारखेपासून राज्यभर हे आंदोलन सुरु राहिल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
गांधी भवन येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे गौरव आहेत’, असे पंडित जवाहरलाल नेहरु यांनी प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणावेळीच जाहीरपणे सांगितले होते. आता पंडित नेहरुंच्या नावाने देवेंद्र फडणवीस अपप्रचार करत आहेत. फडणवीस यांनी नेहरुंचे पुस्तक संपूर्ण वाचलेले दिसत नाही, अर्धवट माहितीच्या आधारावर ते बोलत आहेत. खोटे बोल पण रेटून बोल अशी भाजपाची पध्दत आहे. पंडित नेहरु यांच्याबद्दलचा अपप्रचार फडणवीस यांनी थांबवावा. राजकोट किल्ल्यावरील महाराजांच्या पुतळ्याचे काम ज्याने केले त्या आपटेला अद्याप अटक का केली नाही? तो कुठे पळून गेला? देवेंद्र फडणवीस यांनी अजून माफी का मागितली नाही? असे प्रश्नही नाना पटोले यांनी विचारले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे चेअरमन पवन खेरा यावेळी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याने महाराष्ट्राच्याच नाही तर देशभरातील जनतेच्या मनात प्रचंड राग आहे. फक्त पुतळा कोसळला नाही तर लोकांचे मन दुखावले आहे. जे काम मुघल करु शकले नाहीत ते भाजपाच्या बेईमान लोकांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपकार केल्याच्या अविर्भात माफी मागितली, धमकीच्या स्वरात मागितलेली माफी मंजूर नाही. भाजपा शिवद्रोही असून त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. शिवाजी महाराजांच्या अस्मितेशी चालवलेला खेळ खपवून घेतला जाणार नाही अस खेरा म्हणाले.
पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना पवन खेरा म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी पंडित नेहरु यांचे Discovery of India हे पुस्तक संपूर्ण वाचलेले दिसत नाही. जेलमध्ये असताना संदर्भ मिळाले नाहीत, दुसऱ्या आवृत्तीत सुधारणा करण्यासाठी पंडित नेहरुंनी १९३६ साली पी. आर. देवगिरीकर तसेच श्रीप्रकाश यांना ३ मे १९३६ रोजी पत्र पाठवून संदर्भ मागितले होते व पुढच्या आवृत्तीत सुधारणा केली असे पवन खेरा यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचा प्रकार राजकारणापलिकडचा आहे, या घटनेने जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. १९ व्या शतकात कोण इतिहास लिहित होते हे सर्वांना माहित आहे, योग्य व्यक्तींनी लिहिलेलाच इतिहास वाचला पाहिजे असे शाहू महाराज म्हणाले.
या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार छत्रपती शाहू महाराज, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे चेअरमन पवन खेरा, CWC चे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, ठाणे ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरघे, इ उपस्थित होते.