गांधी भवन कोथरुड येथे २२ व २३ जानेवारी रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन
ग्रंथोत्सवाचे उदघाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार
पुणे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण-2010 अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार व गुरुवार, 22 व 23 जानेवारी, 2025 रोजी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, गांधी भवन, कोथरुड, पुणे येथे ग्रंथोत्सव-2024 चे आयोजन करण्यात आले आहे.
या ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन, विक्री आणि त्यासोबतच विविध साहित्यिक व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उदघाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगला गोडबोले (जेष्ठ साहित्यिक, पुणे) ह्या आहेत. यावेळी पुणे जिल्हयातील सर्व आमदार व खासदार उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रे.श्री. गोखले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
ग्रंथोत्सवात बुधवार 22 जानेवारी 2025 रोजी पहिल्या सत्रात सकाळी 10:00 वाजता ग्रंथदिंडीत कोथरुड परिसरातील शालेय विद्यार्थी व जिल्हयातील शासनमान्य ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यानंतर सकाळी 11:30 वा. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन, दुसऱ्या सत्रात दुपारी 3:00 ते 4:00 वा. “भारतीय संविधानाचे 75 वर्ष” यावर डॉ. कुमार सप्तर्षी, अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, पुणे यांचे व्याखान होणार आहे. दुपारी 4:00 ते 5:30 वा. ‘हसण्यासाठी जगा आणि जगण्यासाठी हसा’ सादरकर्ते मकरंद टिल्लू यांचे विनोदी एकपात्री नाटय होणार आहे.
गुरुवार 23 जानेवारी 2025 रोजी पहिल्या सत्रात सकाळी 11:00 ते दुपारी 12:30 वा. ‘मराठी भाषेचे भवितव्यः आपली जबाबदारी’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये आनंद गांगल (भाषा अनुवादक), डॉ. सागर देशपांडे, श्रीकांत चौगुले (साहित्यिक) व किसन चौधरी सहभागी होणार आहेत. दुपारी 12:30 ते 2:00 वा. मी श्यामची आई बोलते या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. दुसऱ्या सत्रात दुपारी 3:00 ते 4:00 वा. ‘ब्युटी ऑफ लाईफः द डायरी ऑफ अ कॅन्सर सर्व्हयवर’ या पुस्तकाच्या लेखिका श्रीमती आशा नेगी यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे. दुपारी 4:00 ते 5:30 वा शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे काव्यसंमेलन होणार आहे.
ग्रंथोत्सवाचा समारोप 23 जानेवारी 2025 रोजी नामदेवराव जाधव, जेष्ठ साहित्यिक यांच्या उपस्थितीत होणार असून, या दोन दिवसीय ग्रंथोत्सवात विविध नामांकित प्रकाशकाच्या दर्जेदार पुस्तकांचे प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी 10:00 ते सायंकाळी 6:00 वाजेपर्यत असून सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. तरी सर्व नागरिक व ग्रंथप्रेमी रसिकांनी या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा व ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असेही आयोजकांनी कळविले आहे