श्री तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू

पुणे. अपर पिंपरी चिंचवड़ हद्दीत श्री क्षेत्र देहू येथे श्री तुकाराम महाराज बीज सोहळा २०२५ निमीत्त १४ ते १६ मार्च २०२५ या दोन दिवशीय यात्रा कालावधीत इंद्रायणी नदीचे पाणी पिण्याकरीता वापरण्यास मनाई करण्यातबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी निर्गमित केले आहे.
श्री क्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील पाणी पिण्याकरीता व स्वयंपाकाकरीता उपयोगात आणण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. तथापि, ते पाणी भांडी घासणे वा तत्सम अन्य कारणासाठी वापरता येईल. तसेच देहूतील ठिकठिकाणी असलेल्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या नळाचे पाणी पिण्यासाठी वापरावे.
इंद्रायणी नदीच्या पात्रात कोणतेही कपडे धुवू नयेत, अगर कोणत्याही प्रकारे नदीचे पाणी दूषित होईल असे कृत्य करु नये. सदर दूषित पाणी पिल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १३१ प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी आदेश नमूद केले आहे.