ताजा खबरमराठीशहर

सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम पोलीस दलाने करावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Spread the love

पुणे. राज्य सरकारच्यावतीने पोलीस दलाकरीता नवीन कार्यालये, वाहने, सीसीटिव्ही,अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय नेत्रदीपक अशा प्रकारची कामगिरी केलेली असून येत्या काळातही सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम राज्यातील पोलीस दल करेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात आयोजित ‘तरंग-२०२५’ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, विजय शिवतारे, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, सुनील शेळके, हेमंत रासने, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुनीत बालन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते.

 

श्री. फडणवीस म्हणाले, पुणे हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे शहर असून ते राज्याचे उत्पादन व तंत्रज्ञानाचे हब आहे; शहरात आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध नागरिक याठिकाणी येत असतात. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राखण्यासोबत वाहतूकीच्या नियमांचे पालन झाले पाहिजे. नागरिकांना उत्तमप्रकारच्या सेवा देवून त्यांना न्याय दिला पाहिजे, अपराध घडल्यानंतर अपराध्यांना शिक्षा झाली पाहिजे या गोष्टीवर प्रचंड भर पुणे पोलिसांच्या माध्यमातून देण्यात येत असतो. पुणे पोलीसांनी गंभीर घटनेच्यावेळी चांगल्या प्रकारे जलद प्रतिसाद देत त्या घटनांचा उलगडा केलेला आहे. त्यामधील आरोपींना जेरबंद करुन शिक्षा मिळत आहे, हे आपल्याकरीता अधिक महत्त्वाचे आहे. यापुढेही पुण्यासारख्या शहरांमध्ये अधिकाधिक घटनेच्या अनुषंगाने पोलिसांचा प्रतिसादाचा वेळ कमीत कमी असला पाहिजे. पोलिसांचा वावर नागरिकांना जाणवला पाहिजे.

पोलीसांच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्यादृष्टीने देशातील सगळयात चांगला सायबर फ्लॅटफॉर्म राज्याने निर्माण केला आहे. केंद्र शासनाने १९४५ हा क्रमांक राज्याकरीता दिला असून तक्रारदाराला २४ तासाच्या आत कारवाई करुन अहवाल देण्यात येत आहे. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगल्या आरोग्यदायी वातावरणात जगता यावे, याकरीता पोलीस कल्याणाच्यामाध्यमातून आरोग्य, निवासस्थाने अशा अनेक गोष्टी राज्यशासनाने अजेंडावर घेवून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.

नागरिकांना उत्सव चांगल्याप्रकारे साजरा करता यावा, याकरीता राज्यातील पोलीस दल २४ तास बंदोबस्त करीत असतात, उत्सवाच्या काळात कुटुंबापासून दूर राहावे लागते, म्हणून अशा पोलिसांना आपल्या परिवारासोबत एखादा उत्सव साजरा करता यावा, याकरीता पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने पोलिसांचा उत्सव म्हणून ‘तरंग’एक अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता सामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये हास्य असले पाहिजे, त्यांना सुखशांती मिळाली पाहिजे, अपराधापासून मुक्ती मिळाली पाहिजे याकरीता पोलीस काम करीत असतात, अशा उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करुन त्यांचे अभिनंदन करुन यापुढेही अशाच प्रकारचे चांगले काम करतील, अशी अपेक्षा श्री.फडणवीस यांनी व्यक्त केली.

श्री. पवार म्हणाले, राज्यात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहिले पाहिजे, जातीय सलोखा राहिला पाहिजे, शहरातील वाहतूक कोंडी सुटली पाहिजे, नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी ‘कॉप-२४’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्याकरीता पोलीस दलाला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असून यापुढेही राज्य सरकार कमी पडणार नाही. नागरिकांनीही आपली जबाबदारी नीटपणे पार पाडावी, असे आवाहन श्री. पवार म्हणाले.

श्री. कुमार म्हणाले, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने मागील एक वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासोबत गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता विविध उपाययोजना करण्यात आल्या. यापुढे अधिक जोमाने करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल,असे श्री. कुमार म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते कॉप-२४ उपक्रमाअंतर्गत दुचाकी व चारचाकी वाहनांना हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले. तसेच कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे पाल्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमापूर्वी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्याची चित्रफीत दाखविण्यात

आली.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button