
पुणे .अॅक्युअर लाईफ सायन्स फाउंडेशन आणि डॉ. खुर्द गायनॅक इंडॉस्कॉपी व आयव्हीएफ सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एरंडवणे भरत कुंज कॉलनी येथील डॉ. खुर्द हॉस्पिटल येथे पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम (पीसीओएस) विषयी जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले आहे. गुरुवार, दिनांक ६ मार्च सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत रोजी स्त्रियांकरिता मोफत वैद्यकीय शिबीर, व्याख्यान व समुपदेशनाद्वारे याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. शंतनु जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला डॉ. संजीव खुर्द, डॉ. साधना खुर्द आदी उपस्थित होते.
डॉ. संजीव खुर्द म्हणाले, पीसीओएस हा स्त्रियांमध्ये १० ते २० टक्के या प्रमाणात आढळणारा, आधुनिक जीवनशैलीमुळे वाढत जाणारा आणि वंध्यत्वाच्या अनेक कारण्यांपैकी एका महत्वाचे कारण असणारा आजार आहे. मासिक पाळीतील अनियमितता, चेह-यावरील जास्तीचे केस आणि काही रुग्णांमध्ये वजन वाढणे, ही याची लक्षणे असू शकतात. पीसीओएस मुळे वंध्यत्व, मधुमेह, हृदयरोगापासून ते गर्भाशयाच्या कर्करोगापर्यंत गंभीर आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे याविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. याविषयी संस्थेमध्ये संशोधन प्रकल्प देखील सुरु आहे.
अभियानांतर्गत गुरुवारी सकाळी ९ ते १० यावेळेत डॉ. संजीव खुर्द आणि डॉ. आदित्य खुर्द यांचे जनजागृतीपर व्याख्यान होणार असून डॉ. साधना खुर्द या देखील मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सकाळी १० ते १ यावेळेत विनामूल्य समुपदेशन व वैद्यकीय सल्ला दिला जाईल. या अभियानास प्रवेश विनामूल्य असून नावनोंदणी आवश्यक आहे. तरी रुग्णांनी ८६०००२९८६६ या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी. तसेच मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.