
पुणे – जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुभांगी इंडस्ट्रीतर्फे महिला आणि तरुणींसाठी ऍडव्हेंचर बाईक राईडचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. लोहगाव भागातील खांडवे नगर येथील मैदानावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी स्त्री-शक्तीचा सन्मान करुन विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक २ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता पार पडणार असून यामध्ये आतापर्यंत २०० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला आहे. यावेळी ऍडव्हेंचर बाईकचे विशेष साहसी खेळाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शुभांगी इंडस्ट्रीच्या शुभांगी सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मोटोपार्क१९९चे रुपेश चोंधे आणि संस्थेचे इतर पदाधिकारी पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
शुभांगी सावंत म्हणाल्या की, आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत. पुण्यातहि अनेक महिला बाईक रायडींग करत असतात, त्यामुळे एक पाऊल पुढे टाकत त्यांना ऍडव्हेंचर बाईकचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. गृहिणींना क्षणभर विरंगुळा मिळावा या हेतूने महिला दिनानिमित्त विविध खेळांचे आयोजन केले आहे. यामध्ये त्यांना त्याचे कलागुण दाखविण्याची संधी मिळणार असून भरगोस बक्षिसे देखील ठेवण्यात आली आहेत. शुभांगी इंडस्ट्रीच्या माध्यमातून महिलांचा रोजगार वाढविण्यात येत असून याद्वारे महिलांना आर्थिक सक्षमीकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.