
पुणे – श्रीसाई प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने महिला दिनाच्या औचित्य साधून पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तबगार महिलांना त्या त्या क्षेत्रात आदर्श महिला पुरस्कार देण्यात आला. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स हडपसर येथील सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कविसंमेलन व संजयभाऊ चौधरी यांच्या तीन पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले.
याप्रसंगी डॉक्टर संगीता भारती, सौ जागृती कुलकर्णी, हर्षा पिसाळ, सुनिता राजे निंबाळकर, शिल्पा गलांडे, सारिका दळवी, भाग्यश्री साळुंखे व इतर 10 महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी बोलताना रूपालीताई चाकणकर म्हणाल्या, स्त्रियांनी स्वतःचे अधिकार समजून घेण्यासाठी आता संविधानाचे वाचन केले पाहिजे. स्त्रियांसाठी असणाऱ्या योजना व कायदे समजून घेतले पाहिजेत. अबला, शब्द महिलांनी आपल्या शब्दकोशातून बाहेर काढून टाकावा. तुम्ही सर्वजण सबला आहात आदिशक्तीचा अवतार आहात, पुरुषांनी स्त्रियांचा यथोचित आदर सन्मान केला पाहिजे. स्त्रियांना समान वागणूक दिली पाहिजे तरच महिला दिन साजरा झाला असे मी समजेल…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग कालकर यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करून स्त्रियांचा सन्मान करून त्यांचा मनोबल वाढवणे गरजेचे आहे.
त्याचप्रमाणे स्त्री शिक्षणाचा प्रसार व प्रचार होणे गरजेचे आहे. व स्त्रिया 100% साक्षर झाल्या पाहिजेत असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. डॉ. दत्ता कोहिनकर यांनी कौतुकाचे महत्व वेगवेगळी उदाहरणे देऊन पटवून दिले.
त्याचप्रमाणे शरीराच्या सबलतेसाठी रोज व्यायाम व मनाच्या सबलतेसाठी दहा दिवसाची विपश्यना ध्यान साधना करण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ साहित्यिक गौतम कोतवाल यांनी महिला दिनाचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमाला महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर त्याचप्रमाणे पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू पराग कालकर, माईंड पॉवर ट्रेनर डॉ दत्ता कोहिनकर, ज्येष्ठ साहित्यिक गौतम कोतवाल, सामाजिक कार्यकर्ते शितल चोडणकर , सरकारी वकील एन. डी. पाटील, गोवा सांस्कृतिक विभाग प्रमुख दशरथराव परब साहेब, श्रीसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजयभाऊ चौधरी, डॉ. रेखा पौडवाल यासारख्या मान्यवरांची उपस्थिती होती.
संतोष हिंगने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर महादेव पवार
यांनी आभार मानले. सामाजिक कार्यकर्ते संजयभाऊ चौधरी, यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यंकटसाई चालसानी, शरद बोगाळे, विनायक पवार, नागेश भोसले, उत्तम कालेबाग संजय थोरात, शरद पवार, सखाहरी शेळके, बालाजी चौधरी, युवराज माने यांनी परीश्रम घेतले.