नागरिकांच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन करुन शासनाची प्रतिमा उंचविण्याचे काम करावे- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
आगामी काळात जिल्ह्यात स्वच्छ व सुंदर महसूल प्रशासन राबवूया- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे येथे महसूल कामकाजविषयक कार्यशाळा संपन्न
पुणे. महसूल विभागाने नागरिकांच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन घडवून आणण्याकरीता लोकल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. या माध्यमातून शासनाची प्रतिमा जनमाणसात उंचविण्याकरीता कामे करावीत, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित महसूल कामकाजविषयक कार्यशाळेच्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर जिल्हाधिकारी सविता नरके, निवारी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी गावपातळीपासून ते मंत्रालयापर्यंत आपली जबाबदारी चोखपणे पार पाडीत असतात. या विभागामार्फत गाव, तालुका, जिल्हा पातळीवर इतर विभागाशी समन्वयाने कामे करुन नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा. महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून या विभागाकडून नागरिकांच्या अपेक्षा असतात. शासनाच्या विविध मोहीम, उपक्रम या विभागामार्फत राबविण्यात येतात, त्यामुळे विभागाची प्रतिमा मलीन होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. आगामी काळातही प्रत्येकांनी आपल्या कामकाजात पारदर्शीपणे, नागरिकांशी सुसंवाद व सौजन्याची वागणूक देत त्यांची कामे विहीत मुदतीत निकाली काढावे. भूसंपादन, अर्धन्यायिक प्रकरणे वेळेत मार्गी लावून आदेश पारीत केले पाहिजे.
शासनाच्या निर्देशाप्रमाणे आगामी काळात अर्थचक्राला गती देण्याकरीता उद्योजकाला त्रास होणार नाही, याकरीता उद्योगस्नेही वातावरण निर्माण करावे. पेसा कायद्याद्वारे आदिवासी नागरिकांना संवेदनशीलपद्धतीने सोई-सुविधा विहित कालमर्यादेत देण्यात याव्यात. सीएससी व सेतू केंद्रामार्फत अधिकाधिक सेवा उपलब्ध होण्याच्यादृष्टीने वेळोवळी आढावा घेण्यात यावा. शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या 100 दिवस उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. ‘आयजीओटी’ ॲप किंवा संकेतस्थळावर प्रत्येकांनी नोंदणी करुन प्रशिक्षण पूर्ण करुन घ्यावे. या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन कामकाजाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, अशा विश्वास डॉ. पुलकुंडवार यांनी व्यक्त केला.
आगामी काळात जिल्ह्यात स्वच्छ व सुंदर महसूल प्रशासन राबवूया-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी
नागरिकांचा महसूल विभागावरील विश्वास अधिक वृद्धींगत करण्याकरीता गतीमान व पारदर्शक पद्धतीने काम कामकाज करावे. नागरिकांचा वेळ, इंधन आणि खर्चात बचत व्हावी यासाठी कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर करावा. पुणे जिल्हा राज्यात अग्रेसर राहील, यादृष्टीने आपण सर्वांनी मिळून स्वच्छ, सुंदर महसूल प्रशासन राबवूया, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
श्री.डूडी म्हणाले, शासनाची प्रतिमा उंचविणारी कामे तसेच विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम विभागामार्फत राबविण्यात येत असून तळागळातील पात्र नागरिकांना त्यांचा लाभ व्हावा यासाठी योजनांची माध्यमांद्वारे जनजागृती झाली पाहिजे. भूसंपादन, पुनर्वसनाची प्रकरणे विहीत वेळेत निकाली काढावेत. आगामी काळात कामकाजाचे मूल्यमापन करण्यात येणार असून उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यापुढे जिल्ह्यात अनधिकृत कामे होणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी.
जिल्ह्यात सर्व विभागांनी मिळून अधिक लोकसंख्या असलेल्या मध्यवर्ती गावात लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आदी घटकांना सोबत घेवून लोकशाही दिनाचे आयोजन करावे. गाव, मंडळ, तालुकास्तरावर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला पाहिजे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांकरीता ठरवून दिलेल्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहावे, येणाऱ्या नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी, त्यांच्या कामकाजाची माहिती द्यावी. कामे करताना आरोग्याची काळजी घ्यावी. कामाचा हेतू प्रमाणिक असल्यास विभाग आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील, असा विश्वास श्री. डूडी यांनी व्यक्त केला.
या कार्यशाळेत ई-फेरफार, ई-हक्क, ई-चावडी, ई-पिकपाहणी, ई-क्युजे कोर्ट, ई-कोर्ट, डी-४, शासकीय जागा मागणी, सेवादूत, महाखनिज, महामहसूल, आपले सरकार, पीजी पोर्टल, १०० दिवस कृती आराखडा आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेला मुद्रांक जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी, अधीक्षक भूमी अभिलेख, सहायक अधीक्षक भूमी अभिलेख, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, सेतू चालक आदी उपस्थित होते.
उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.