जीवन शैलीब्रेकिंग न्यूज़शहर

महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्याची गरज : प्रख्यात उद्योजिका सुप्रिया बडवे 

स्वयंसिद्धा आणि युवा उद्योजिका पुरस्कार प्रदान सोहळा

Spread the love

पुणे . अथक परिश्रम, चिकाटी आणि वेगवेगळ्या आघाडय़ांवर एकाच वेळी काम करण्याचे कसब … असे उद्योजक होण्यासाठी आवश्यक असणारे गुण महिलांमध्ये उपजतच असतात. परंतु महिलांना योग्य वेळी संधी न मिळाल्यामुळे अनेक महिला उद्योग क्षेत्रामध्ये मागे राहतात. महिलांचे उद्योग क्षेत्रातील प्रमाण वाढण्यासाठी महिलांना योग्य वेळी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे,असे मत प्रख्यात उद्योजिका सुप्रिया बडवे यांनी व्यक्त केले.

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) तर्फे उद्योग क्षेत्रातील महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष-विश्राम कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत जोशी, हर्षल लेले, युवा महिला आघाडी सदस्या प्रतिभा संगमनेरकर, स्वाती कुलकर्णी, कार्तिकी जोशी, मंजुषा वैद्य,अंजली दारव्हेकर, उपेंद्र केळकर, आशिष कुलकर्णी, सचिन पंडित, प्रशांत देशपांडे, अजय कुलकर्णी मंदार महाजन उपस्थित होते.

स्वयंसिद्धा पुरस्कार पुण्यातील गजानन एंटरप्राईजेसच्या संचालिका वैशाली धर्माधिकारी यांना आणि युवा उद्योजिका पुरस्कार आर्टिसन प्रिंट अ‍ँड पॅकच्या संचालिका सानिया वाळिंबे यांना प्रदान करण्यात आला. तसेच यंदा युवा गौरव पुरस्कार पोलीस निरीक्षक प्रतिभा जोगळेकर यांना प्रदान करण्यात आला.युवा उपक्रमांतर्गत कै.सौ. सावित्रीबाई नारायण जोशी स्मरणार्थ स्वयंसिद्धा पुरस्कार आणि कै.मनोरमा शामराव कुंभोजकर स्मरणार्थ युवा उद्योजिका पुरस्कार दिला जातो. तर, युवा गौरव पुरस्कार हा युवा कार्यकारिणी पुरस्कृत आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

सुप्रिया बडवे म्हणाल्या, घर आणि उद्योग सांभाळताना महिलांची कायम कसरत होत असते. घर सांभाळताना येणाऱ्या अडचणी आणि उद्योग सांभाळताना येणाऱ्या अडचणी या वेगवेगळ्या असतात. या दोन्ही सोडवण्यासाठी कौशल्यांची गरज असते. काही कौशल्ये आत्मसात करता येतात तर काही कौशल्ये उद्योग करताना शिकता येतात. त्यातूनच खचून न जाता महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये उद्योगांसाठी पुढे आले पाहिजे.

सानिया वाळिंबे म्हणाल्या, उद्योग क्षेत्रामध्ये भरभराट होण्यासाठी महिलांना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातून तसेच ज्या क्षेत्रामध्ये त्या उद्योग करत आहेत, त्या क्षेत्रातील कुटुंबाचे प्रोत्साहन असणे गरजेचे असते. दोन्हीचा ताळमेळ योग्य साधला तर निश्चितच महिला उद्योग क्षेत्रामध्ये आघाडीवर जाऊ शकतात.

प्रतिभा जोगळेकर म्हणाल्या, स्वतःच्या परिवाराकडून मिळालेला हा पुरस्कार म्हणजे माझ्या कामगिरीवर मला मिळालेली कौतुकाची थाप आहे. मला सासर आणि माहेर दोन्हीकडून चांगला पाठिंबा मिळाल्यामुळे मी पोलीस क्षेत्रामध्ये एक महिला असूनही चांगली कामगिरी करू शकले.

वैशाली धर्माधिकारी म्हणाल्या, युवा परिवाराने दिलेला पुरस्कार हा केवळ माझा एक महिला म्हणून सत्कार नव्हे तर एक उद्योजिका म्हणून सत्कार आहे. हा पुरस्कार केवळ माझ्यासाठीच नव्हे तर सर्व महिलांसाठी प्रेरणादायी पुरस्कार आहे. एक महिला उद्योजिका झाली तर ती केवळ आपल्या कुटुंबासाठी हातभार लावत नाही तर समाजाचा विकास करण्यासाठी हातभार लावत असते, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन आयुषी भावे यांनी केले व हर्षल लेले यांनी आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button