नामदार चंद्रकांत पाटील यांचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना अभिवादन

पुणे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही आज सकाळी सारसबाग येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच, सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी नामदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कार्यातून समाजाला एक दिशा दिली. विशेष करुन कामगार वर्गामध्ये आत्मविश्वास निर्माण करुन, त्यांना समाजात एक स्थान मिळवून दिले. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांच्या विपुल साहित्याचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या कार्यातून समाजबांधवांनी प्रेरणा घेऊन समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा; यासाठी कार्य करावे. त्यासाठी शासनाकडून ही सर्वतोपरी मदत मिळेल” अशी भावना व्यक्त केली.
दरम्यान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महापुरुष अभिवादन समितीच्या वतीने आयोजित एकता मिसळ मध्येही नामदार पाटील यांनी सहभाग घेत सर्वांसह मिसळचा आस्वाद घेतला. तसेच,समितीने सुरु केलेल्या ‘पुस्तक दान’ उपक्रमाचे देखील कौतुक केले.
“पुस्तके ही मानवी जीवन घडवणारी संपदा आहे. वाचनामुळे चांगली पिढी घडण्यास मदत होते. महापुरुष अभिवादन कृती समिती आणि लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात येत असलेला ‘वाचन चळवळ’ हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त केली.
यावेळी माजी आमदार दीपक पायगुडे, भाजप नेते हेमंत रासने, भाजपा कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, कुणाल टिळक, धनंजय जाधव, प्रल्हाद गवळी यांच्यासह अनुयायी उपस्थित होते.