ताजा खबरमराठी समाचारमहाराष्ट्र

जिरायत भागाला ओलिताखाली आणण्यासाठी नीरा – कऱ्हा उपसा सिंचन योजना करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Spread the love

बारामती.बारामती तालुक्यातील जिरायत भागातील जमीन ओलिताखाली आणण्यासाठी १ हजार २५ कोटी रुपयांची नीरा – कऱ्हा उपसा सिंचन योजना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

जळगाव क.प. वि.का. सेवा सहकारी संस्थेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रकाश जगताप, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, रणजित तावरे, जळगाव क.प. वि.का. सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन रमेश चव्हाण, व्हॉईस चेअरमन रतनबाई पोंदकुले आदी उपस्थित होते.

या भागात शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कायमच प्रयत्न करण्यात आले असून अद्यापही त्यावर काम करणे बाकी असल्याने उपसा सिंचन योजना राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, या योजनेत या परिसरातील बहुतांश जिराईत गावे समाविष्ट करण्यात येणार असून सुमारे ४५ हजार एकर क्षेत्र पाण्याखाली आणण्यात येणार आहे. या योजनेत ७.५ फूट व्यासाची पाइपलाइन असणार असून त्यात दोन टप्प्यात २ हजार अश्वशक्तीचे १२ पंप तर २ हजार १५० अश्वशक्तीचे ७ पंपाद्वारे पाणी उचलले जाणार आहे. प्रतिवर्षी या भागात २ टीएमसी पाणी देण्यात येणार असून १ टीएमसी पाणी ३० दिवसात विहिरी, पाझर तलाव, बंधारे भरण्यासाठी देण्यात येईल तर १ टीएमसी पाणी उर्वरित ११ महिन्यासाठी देण्याचे नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या पाचपैकी तीन वर्षात बारामती तालुक्यात रस्ते, रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, बस स्थानक, विविध भव्य इमारती आदींसाठी ८ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी दिला आहे. सर्वांना घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देऊन राज्यशासनाच्यावतीने लाडकी बहिण योजनेची तीन महिन्यांची रक्कम देण्यात आली असून ऑक्टोबर, नोव्हेंबर या दोन महिन्यांची रक्कम लवकरच वितरीत करण्यात येईल, असे सांगितले.

ते पुढे म्हणाले, शासनाने सर्वच घटकांसाठी विविध निर्णय घेतले असून शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेंतर्गत ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज, दूध उत्पादकांना चांगला दर मिळावा यासाठी प्रतीलिटर ७ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, कोतवाल, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक आदींचे मानधन वाढविण्यात आले आहे.

विविध कार्यकारी सेवा संस्था ही गावाच्या विकासाची नाडी असते असे सांगून श्री. पवार पुढे म्हणाले, सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देण्याचा आमचा प्रयत्न असतो. जळगाव क.प. वि. का. स. सहकारी संस्थेने उपलब्ध जागेमध्ये गावाच्या वैभवात भर घालणारी वास्तू उभी केली आहे. संस्थेची आर्थिक स्थिती चांगली असून स्वस्त धान्य दुकान, आर.ओ. प्रकल्प, सी.एस.सी. सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. त्याशिवाय भविष्यात प्रधानमंत्री जन औषधी केंद्र आणि संस्थेच्या इमारतीवर सौर पॅनल बसविण्यात येणार असल्याने संस्था उत्तम काम करत आहे, असेही ते म्हणाले.

संस्थेच्या मालकीची १ हजार १२८ चौरस फूट जागा असून त्यावर २ हजार ४०० चौरस फूट दोन मजली बांधकाम केलेले आहे. इमारतीचा आराखडा, अंदाजपत्रक आदीसाठी ८५ हजार रुपये, बांधकामासाठी ३४ लाख ८० हजार रुपये आणि विद्युतीकरण खर्च १ लाख १० हजार रुपये झाला आहे. संस्थेत एकूण ८५७ सभासद असून संस्थेची उलाढाल ५ कोटी ४७ लाख रुपये एवढी आहे, अशी माहिती यावेळी प्रास्ताविकात संस्थेचे संचालक गोरख चौलंग यांनी दिली.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते यावेळी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेंतर्गत शून्य वीज बील प्रातिनिधिक स्वरूपात ५ शेतकऱ्यांना देण्यात आले.

कार्यक्रमास बारामती खरेदी विक्री संघाचे चेअरमन विक्रम भोसले, जळगाव क. प. चे सरपंच रामभाऊ जगताप, भिलारवाडीच्या सरपंच सत्त्वशीला जगताप, सेवा संस्थेचे संचालक, नागरिक उपस्थित होते.

काऱ्हाटी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते काऱ्हाटी येथे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गतच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. त्यामध्ये जाधववाडी ते कऱ्हा नदी रस्ता, जाधववाडी स्मशानभूमी सुशोभीकरण, काऱ्हाटी स्मशानभूमी बैठक व्यवस्था करणे या एकूण ४० लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. याशिवाय काळाडाग रस्ता ते जळगाव सुपे रस्ता, यशवंतराव सभागृह सुशोभीकरण करणे, जाधव वस्ती भैरवनाथ मंदिर रस्ता, उर्वरित रानमळा रस्ता, माकरवस्ती रस्ता, संजय लोणकर यांचे घर ते पीडीसीसी बँक रस्ता ही १ कोटी ५० लाख रुपयांची कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सरपंच श्रीमती दिपाली लोणकर, उपसरपंच श्रीमती रेखा लोणकर आणि ग्रामपंचायत सदस्यांच्यावतीने उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचा सत्कार करण्यात आला.

*सुपे गावातील ३ कोटी ४५ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन*
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुपे गावातील भैरवनाथ सभामंडप व नियोजित मंदिर, विविध रस्ते, भूमिगत गटार, प्राथमिक शाळा संरक्षण भिंत, ग्रामसचिवालय इमारत बांधकाम, समाज मंदिर, विठ्ठल मंदिर सभामंडप, स्वच्छतागृह, शह मन्सूर दर्गा भक्त निवास आदी एकूण ३ कोटी ४५ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांसह सरपंच तुषार हिरवे, उपसरपंच श्रीमती अश्विनी सकट, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button