मराठीशहर

पहिल्या ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तब्बल ३७५ हून अधिक कुस्तीपटू लढणार

लोणीकंद येथे रंगणार ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी स्पर्धा : दिनांक २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी स्पर्धा

Spread the love
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ पुणे यांच्या सहकार्याने व पै. ओंकार कंद युवा फाऊंडेशन, श्री प्रदीपदादा कंद युवा मंच यांच्या वतीने आयोजन

पुणे . महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने पहिल्या वरिष्ठ ग्रीको रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी लोणीकंद मधील हिंद केसरी मैदान येथे ही स्पर्धा होणार आहे. जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ पुणे यांच्या सहकार्याने व पै. ओंकार कंद युवा फाऊंडेशन, श्री प्रदीपदादा कंद युवा मंच यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ३७५ पेक्षा अधिक कुस्तीपटू ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस योगेश दोडके, उपाध्यक्ष विलास कथुरे, स्पर्धेचे स्वागताध्यक्ष पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद व स्पर्धेचे आयोजक भाजपा युवा नेते ओंकार हनुमंत कंद, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज कटके उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार राहुल कुल, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस व सरचिटणीस योगेश दोडके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

संदीप भोंडवे म्हणाले, या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची मान्यता असलेले ६ महानगरपालिका व ३६ जिल्हा असे एकूण ४२ जिल्हा कुस्तीगीर संघ सहभागी होणार आहेत. एकूण १० वजनगटामध्ये ३७५ ते ४०० कुस्तीगीर स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी ३० तांत्रिक अधिकारी ( पंच ) निवडण्यात आले असून ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी किताबासाठी ८७ ते १३० किलो हा वजनगट निश्चित करण्यात आलेला आहे.

प्रदीप कंद म्हणाले, स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री दत्तामामा भरणे, नामदार जयकुमार गोरे, आमदार ज्ञानेश्वर कटके व आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते होणार आहे. ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लास चांदीची गदा देण्यात येणार आहे.

ओंकार हनुंमत कंद म्हणाले, स्पर्धा पहायला येणारे कुस्ती शौकीन, कुस्तीपटू, तांत्रिक अधिकारी यांच्या दृष्टीने योग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे. कुस्तीपटूंना सर्व आवश्यक सुविधा यावेळी देण्यात येतील. महाराष्ट्र केसरी विजेत्यास चांदीची गदा व रोख बक्षीस तसेच इतर वजनीगटांसाठी देखील आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button