
पुणे . ढोल ताशांचा गजर…भस्माची उधळण… नंदी,गण आणि देवी देवतांच्या साक्षीने वाजत गाजत काढलेली शिवाची वरात, अशा भक्तीमय वातावरणात शिव पार्वती विवाह सोहळा रंगला. शिवभक्तांनी यावेळी पुष्पवृष्टी करत विवाह सोहळ्यात सहभाग घेतला. हर हर महादेव च्या जयघोषात झालेला, भक्तीने भारलेला हा विवाह सोहळा पुणेकरांसाठी अविस्मरणीय ठरला.
शिवाजीनगर मधील श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्र महोत्सवात शिव – पार्वती विवाह सोहळा व मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत बहिरट पाटील, सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, विश्वस्त महेश दुर्गे, संजय सातपुते उपस्थित होते.
मिरवणूकीत समर्थ ढोल ताशा पथकाचे वादन झाले. श्री जंगली महाराज मंदिर, शिवाजीनगर गावठाण मार्गे मंदिरात मिरवणूक आली.
हनुमंत बहिरट पाटील म्हणाले, शिव आणि पार्वती यांच्या विवाह सोहळ्याचा प्रसंग अत्यंत मंगलमय आणि भक्तिपूर्ण मानला जातो. हा विवाह केवळ दैवी प्रेमाचे प्रतीक नसून, भक्तांसाठीही एक महत्त्वाचा आध्यात्मिक संदेश देणारा आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
संजय सातपुते म्हणाले, संगमनेर येथील अघोरी आख्याड्यातील कलाकारांनी शिव पार्वती विवाह सोहळा सादर केला. महाशिवरात्रीनिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. यामध्ये ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, कार्तिकी गायकवाड आणि कलाकारांनी गायन सेवा दिली.