
पुणे .बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंड, मुखवटा साकारण्यात आला. बारा ज्योतिर्लिंग क्षेत्र उज्जैन येथील श्री महाकालेश्वर येथील शिवपिंड व मुखवटा पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली.
महाशिवरात्रीनिमित्त श्रीमंत सरदार कुमारराजे रास्ते व स्नुषा संजीवनी माधवराजे रास्ते यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, कार्यकारी विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, खजिनदार अॅड.रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख सुनिल रुकारी, उत्सव उपप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अॅड. शिवराज कदम जहागिरदार, महेंद्र पिसाळ, अॅड.शिवराज कदम जहागिरदार, डॉ. पराग काळकर, युवराज गाडवे आदी उपस्थित होते.
मंदिरातील पुरुषोत्तम वैद्य गुरुजी, उमेश धर्माधिकारी, प्रताप बिडवे, विनायक झोडगे, वैभव निलाखे, शोभा गादेकर आदींनी चक्क्याची शंकराची पिंड आणि आरास दोन तासात साकारली. सुकामेवा, फळे आणि विविध प्रकारच्या फुलांचा वापर करुन ही चक्केश्वराची पूजा साकारण्यात आली. प्रमोद व सौ. लता भगवान तसेच लीना भागवत यांनी साकारलेला महाकालेश्वरचा मुखवटा विशेष आकर्षण ठरला.
ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे यांनी माहिती दिली की महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात दरवर्षी चक्केश्वराची पूजा करण्यात येते. यावर्षी १०१ किलो चक्का वापरुन शंकराची पिंड साकारण्यात आली. भगवान शंकराचा महाकालेश्वर येथील मुखवटयाची प्रतिकृती हे विशेष आकर्षण होते. बदाम, द्राक्षे, नारळ यांसह विविध प्रकारच्या फळे, फुलांचा वापर देखील करण्यात आला आहे. विश्वस्त अॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी सांगितले की या चक्क्याचे श्रीखंड करून रविवारी अनाथालयांमध्ये देण्यात येईल तसेच मंदिरात भाविकांना प्रसाद वाटप करण्यात येईल.