
पुणे . मराठयांना दूरदृष्टी नाही, अशी काही लोकांनी समजूत करुन दिली आहे. मात्र, मराठा आंत्रप्रिन्युअर्स असोसिएशनने अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. उद्योग करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्याला तोंड देत तरुणांना विविध उद्योग करता येणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला एकत्र करण्याची शिकवण दिली, ती आपण पुढे अंमलात आणूया, असे मत पद्मश्री अॅड.उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.
व्यावसायिकांमध्ये उद्योजकता व कल्पकता यांचा विकास व्हावा, या उद्देशाने मराठा आंत्रप्रिन्युअर्स असोसिएशन तर्फे ‘एमईए एक्झिबिशन २०२५’ चे आयोजन महालक्ष्मी लॉन्स, डीपी रस्ता, कर्वेनगर येथे करण्यात आले. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, सारथी चे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर, असोसिएशनचे अध्यक्ष अरुण निम्हण, सचिव राजेश कुराडे, उपाध्यक्ष नितीन भोसले, कमिटी मेंबर सायली काळे, महेश घोरपडे, अभिजित जाधव, सागर तुपे, तेजस चरवड, संतोष मते, विक्रम गायकवाड, किशोर जगताप, भारती मुरकुटे, सई बहीरट आदी उपस्थित होते.
राजेंद्र भोसले म्हणाले, मराठी माणूस मागे का पडतो? याची अनेक पुस्तके वाचली आहेत. इतरांचे अनुकरण आणि लांबवरचा प्रवास हे आपण करीत नाही. या परिस्थितीत आता बदल होत असून मराठी तरुण उद्योजक आता देशभर पहायला मिळतात. अतिराजकारणामुळे देखील मराठी माणूस मागे रहात असल्याचे दिसून येते. मात्र, मराठा आंत्रप्रिन्युअर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या प्रदर्शनांमुळे उद्योजक एकत्र येत सुसंवाद साधत असल्याचे चित्र आशादायी आहे.
अरुण निम्हण म्हणाले, बांधकाम, वित्त, कंपनी सेक्रेटरी, डॉक्टर्स, हॉस्पिटॅलिटी, इंडस्ट्रियल, आॅटोमोबाईल, एफएमसीजी, अॅर्व्हटायझिंग, ऊर्जा, सौंदर्य, फॅशन, गुंतवणूक, आयटी, हॉटेल इंडस्ट्री, हेल्थकेअर, फायनान्स यांसह गृहसजावटीपासून प्रवासापर्यंत आणि सौंदयार्पासून वित्तव्यवस्थेपर्यंत सर्व क्षेत्रातील सेवा व उत्पादने एकाच छताखाली पुणेकरांना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात उद्योजक यामध्ये सहभागी झाले आहेत.
नवीन व्यवसायाच्या संधी, उत्पादने व सेवांचे स्टार्टअप्स, व्यवसायवृद्धीचे नवे पर्याय, दर्जेदार उत्पादनांची खरेदी व माहिती अशी अनेक उद्दिष्टे येथे साध्य होत आहे. रविवार, दिनांक २ मार्च पर्यंत दिवसभर सुरु असलेले हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.