
पुणे. स्पोटर्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे लायन शंतनु सिद्धा स्मृतीप्रित्यर्थ तिसर्या ‘लायन्स् प्रौढ करंडक’ (४० वर्षावरील) टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ८ मार्च ते ६ एप्रिल २०२५ या कालावधीत होणार आहे. ही स्पर्धा येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स स्पोटर्स अॅकॅडमी मैदानावर होणार आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पोटर्सफिल्ड मॅनेजमेंटचे सनी मारवाडी यांनी सांगितले की, साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्या या स्पर्धेत एकूण ८ निमंत्रित संघ सहभागी होणार आहेत. ४० वर्षावरील खेळाडू या स्पर्धेत भाग घेणार आहेत. ही स्पर्धा लायन शंतनु सिद्धा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे सलग तिसरे वर्ष असून साखळी आणि बाद फेरी मिळून एकूण १९ सामने स्पर्धेत होणार आहेत.
एलिट क्रिकेट क्लब, सीए रॉयल्स्, जेडब्ल्युडी मॅजिशियन्स्, गार्गी एज्युकॉन, रिस्क्राईब, दिक्षीत रॉयल्स्, रेव्हेल विनर्स आणि रायगड वॉरीयर्स या संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन गुरूवारी, ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू तेजल हसबनीस यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनाचा सामना गार्गी एज्युकॉन आणि रिस्क्राईब या दोन संघांमध्ये रंगणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना आणि स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, ६ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे.
विजेत्या संघाला करंडक तर, उपविजेत्या संघाला करंडक आणि मेडल्स मिळणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक तसेच उदयोन्मुख खेळाडू याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर आणि फायटर ऑफ मॅच अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गतवर्षी (२०२४) न्युट्रीलिशियस् क्लब संघाने विजेतेपद मिळवले होते.