
पुणे : सर्व नेत्यांवर जात आणि धर्माचे शिक्के लागले आहेत. कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा वापर केला नाही किंवा हे या अमुक जाती, धर्माचे नेते नाही, असे एकमेव नेते म्हणजे महात्मा गांधी आहेत. बापूंवर कोणत्याही जाती, धर्माचा शिक्का नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी शनिवारी केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे कोथरूड येथील गांधी भवन परिसरात आयोजित गांधी विचार साहित्य संमेलनातील दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात ‘हिंदू – मुस्लिम प्रश्न आणि गांधीजी’ या विषयावरील परिसंवाद ते बोलत होते. लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते इरफान इंजिनीअर, लेखक आणि पत्रकार किशोर बेडकीहाळ यांनी या परिसंवादात भाग घेतला. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन अध्यक्षस्थानी होते. सुनील पाटील यांच्या हस्ते किशोर बेडकीहाळ आणि अन्वर राजन यांचा सत्कार करण्यात आला. मिलिंद गायकवाड यांच्या हस्ते इंजिनीअर यांचा सत्कार करण्यात आला.
गांधी म्हणाले, जिना, सावरकर, अडवाणी आणि मोदी यांना विशिष्ट समाजाचे नेते म्हणून ओळखले जाते. बापूंवर असा शिक्का मारता येत नाही. बापूंवर मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप करण्यात आला आणि या तुष्टीकरणाला तर आता देशद्रोहाचे स्वरूप देण्यात आले आहे. काही लोक बापूला शत्रू आणि नथुरामला दिव्य मानतात. त्याची पूजा केली जात आहे. या लोकांवर बोलणे गरजेचे आहे. घरी सर्वधर्मीय लोक यायचे त्यातून बापूंवर सर्वधर्माचा संस्कार झाला. मोहनदासचे महात्मा कसे झाले याचा अभ्यास केला पाहिजे. गांधींना आजचे मापदंड लावून चालणार नाही. त्यांना मोजण्यासाठी हे मापदंड पुरेसे नाहीत. बांगलादेशमध्ये हिंदू सुरक्षित नाहीत तर तिथे एकही नेता गेला नाही. हिंदू सुरक्षित नसतील किंवा मुस्लिम सुरक्षित नसतील तर बापू तिथे जायचे आणि हल्ला करणाऱ्यांना खडसावायचे. अशा प्रकारचे राजकारण आज कोणता नेता करेल ? देशात विभाजनाचे राजकारण सुरू असून आपण हिंदू आणि मुस्लिम असे बोलण्यापेक्षा भारतीय म्हणून बोलले पाहिजे.
बेडकीहाळ म्हणाले, गांधींवर खिलाफत चळवळ आणि मुस्लिम अनुनयाचा आरोप करण्यात येतो. गांधी भारतात येण्यापूर्वी बंगालची फाळणी झाली होती. जागतिक पातळीवरच्या मुस्लिमांचे नेतृत्व म्हणून तुर्कस्थानच्या खलिफाकडे पाहिले जात होते. ब्रिटिशांमुळे त्याचे स्थान धोक्यात आल्याने जगभरातील मुस्लिमांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. मुस्लिम समाजामध्ये ब्रिटिशांविरोधात असंतोष निर्माण करण्याची ही संधी आहे, असे गांधीजींनी मानले. हिंदू-मुस्लिम एकजुटीचा सर्वात चांगला कालखंड लखनौ करारानंतर १९२२ ते १९३७ पर्यंतचा आहे.
इंजिनीअर म्हणाले, ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी हिंदू- मुस्लिम प्रश्न तणावाचा नव्हता. ब्रिटिशांनी सत्ता राबविण्यासाठी हा झगडा निर्माण केला. त्यानंतर मुस्लिम लीगला ताकद मिळाली. गांधी ही नैतिक शक्ती आहे. सर्व धर्मांत सत्य आहे, असे गांधींना वाटायचे. ईश्वर हे सत्य नाही तर सत्य हाच ईश्वर आहे, असे त्यांनी सांगितले. गांधींनी सत्याचा पाठलाग करायला सांगितला.
अध्यक्षीय भाषणात अन्वर राजन म्हणाले, महात्मा गांधींचे व्यक्तिमत्त्व धार्मिक होते, पण त्यांना कोणत्या एका धर्मात बसवता येणार नाही. जगातील, भारतातील, महाराष्ट्रातील कोकण , मराठवाडा येथील मुस्लिम वेगळे आहेत. मुस्लिमांमध्ये वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृती आहेत. त्यांच्या संस्कृतीमध्ये स्थानिक संदर्भ आहेत. गांधींच्या चळवळीत महिलांचा सहभाग सर्वाधिक होता. त्याआधी आणि नंतर तेवढा सहभाग नव्हता. स्वाती महाळंक यांनी सूत्रसंचालन केले. कमलाकर शेटे यांनी आभार मानले. ॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
महात्मा गांधींनी भारतामध्ये लोकशाहीची जागा निर्माण करून दिली. तसे झाले नसते तर भारताचा हिंदू पाकिस्तान झाला असता. सध्याच्या सत्ताधाऱ्यांचे हेच स्वप्न आहे, पण ते पूर्ण होणार नाही. गांधींना मारणे म्हणजे लोकशाहीची जागा नष्ट करण्याचा प्रयत्न होता, असे मत ज्येष्ठ कामगार नेते कॉ. अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केले. धर्म म्हणजे अस्मिताबाजी आणि धर्म म्हणजे द्वेष हे नाकारयचे असेल आणि धर्मचिकित्सेची जागा ठेवायची असेल तर गांधी नावाचा अवकाश अनुभवला पाहिजे. जात, धर्म आणि लिंग द्वेषाचे वातावरणाविरोधात सर्वांनी मिळून लढले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
गांधी विचार साहित्य संमेलनात ‘जात, वर्ग आणि लिंग संघर्ष गांधीजींच्या दृष्टिकोनातून’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. स्त्रीवादी कार्यकर्त्या डॉ. धम्मसंगिनी रमा, समाजशास्त्रज्ञ डॉ. श्रुती तांबे या परिसंवादात सहभागी झाले होते. रोहन गायकवाड यांनी अभ्यंकर यांचा सत्कार केला. रेश्मा सांबारे यांनी तांबे आणि धम्मसंगिनी रमा यांचा सत्कार केला.
धम्मसंगिनी रमा म्हणाल्या, जात ही व्यवस्था आहे. जात आणि पुरुषसत्ता यातून स्त्रीदास्य निर्माण झाले. याबाबतचे मूलभूत चिंतन गांधींच्या विचारात दिसत नाही. जात कशी काम करते, या व्यवस्थेबद्दल गांधींच्या विचारात हाती काही लागत नाही. पण, त्यांच्या उदारमतवादी विचारांत नंतर काही मांडणी दिसू लागते. जात ही ग्रामस्वराज्याचा गाभा आहे. जात व्यवस्था ही उत्पादक रचना आहे. हा गांधींचा पूर्वीचा विचार होता. नंतर त्यात प्रागतिक विचारांमुळे बदल झाला असे मला वाटते. जातीअंत म्हणजे अस्पृश्यता न पाळणे हे प्राथमिक काम आहे आहे. पण, साधन , संपत्तीमध्ये वाटा आणि शासन व्यवस्थेत स्थान असले पाहिजे. देशात जातीच्या वस्त्या आहेत. इथे लोकांना का राहावे लागते, याचे मूलभूत चिंतन गांधी विचारांचे सरकार सत्तेत असताना झाले नाही.
तांबे म्हणाल्या, धर्मावरून जगात दुफळी माजली आहे. भांडवलशाही वापरून जात, धर्माआधारे सत्ता राबवली जात आहे. ८५ टक्के आदिवासी विस्थापित झाले आहेत. विकासाच्या प्रक्रियेने त्यांना भिरकावून लावले आहे. जंगले उद्ध्वस्त झाली आहेत. हा आदिवासी आज शहरांत मेट्रोचे काम करत आहे. अशा वातावरणात माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळणार आहे का नाही ? गांधींमध्ये विरोधाभास होता पण कृतिशील लोकांच्या बाबतीत हा धोका असतो. गायपट्ट्यातील कर्मठ लोकांना घराबाहेर आणण्याचे काम गांधींनी केले.