
पुणे .शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) तर्फे महिला उद्योजिका पुरस्कार २०२५ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यांतर्गत वितरित होणारा स्वयंसिद्धा पुरस्कार पुण्यातील गजानन एंटरप्राईजेसच्या संचालिका वैशाली धर्माधिकारी यांना आणि युवा उद्योजिका पुरस्कार आर्टीसन प्रिंट अँड पॅकच्या संचालिका सानिया वाळींबे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच यंदा युवा गौरव पुरस्कार पोलीस निरीक्षक प्रतिभा जोगळेकर यांना प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला संस्थेचे कार्यवाह श्रीकांत जोशी, युवा महिला आघाडी सदस्य प्रतिभा संगमनेरकर, स्वाती कुलकर्णी, कार्तिकी जोशी, मंजुषा वैद्य, मंदार महाजन आदी उपस्थित होते.
टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात शनिवार, दिनांक १५ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यसभेच्या खासदार प्रा.डॉ.मेधा कुलकर्णी या असणार आहेत. तर, बेलराईज इंडस्ट्रीजच्या डॉ. सुप्रिया बडवे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. युवा उपक्रमांतर्गत कै.सौ. सावित्रीबाई नारायण जोशी स्मरणार्थ स्वयंसिद्धा पुरस्कार आणि कै.मनोरमा शामराव कुंभोजकर स्मरणार्थ युवा उद्योजिका पुरस्कार दिला जातो. तर, युवा गौरव पुरस्कार हा युवा कार्यकारिणी पुरस्कृत आहे.
सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार सोहळ्यानंतर तिन्ही पुरस्कारार्थींची मुलाखत होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ ही संस्था १९४० साली स्थापन करण्यात आली. युवा हा उपक्रम २००४ साली स्व. चंद्रकांत जोशी यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील अधिवेशनात सुरु करण्यात आला होता.