
पुणे .छत्रपती शिवाजी महाराज यांनी धर्म, जात, पंथ याच्या पलिकडे जाऊन देशासाठी आणि हिंदू धर्मासाठी काम केले. त्यांच्या विचारांची आजही देशाला गरज असून त्यांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्याची आणि त्या माध्यमातून देशभक्त तरुण घडवण्याची आज गरज आहे, असे मत तेलंगणाच्या रणरागिणी हिंदुत्ववादी नेत्या माधवी लताजी यांनी व्यक्त केले.
राजे शिवराय प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती महोत्सवाचे उद्घाटन जय शिवराय चौक, कर्वेनगर येथे माधवी लताजी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रबोध उद्योग समूहाचे संचालक मोहन गुजराथी, प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पवळे, अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज स्वप्निल राजे होळकर, अध्यक्ष अतुल गोणते, उद्योजक गणेश पलांडे, मकरंद केळकर व प्रल्हाद बोराडे यावेळी उपस्थित होते.
देशाच्या रक्षणार्थ वीरमरण पत्करलेले भारतीय लष्करातील जवान हुतात्मा अमर पवार यांना नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे पुरस्कार आणि शिक्षण व आरोग्य क्षेत्रात काम करणा-या सेवा आरोग्य फाऊंडेशनला स्व. ज्ञानेश पुरंदरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ज्ञानेश सेवा समर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जन्मशताब्दी निमित्ताने कर्मभूमी किल्ले महेश्वर व धर्मभूमी काशी विश्वेश्वर घाटाची प्रतिकृती व माहितीपट देखील सादर करण्यात आला.
माधवी लताजी म्हणाल्या, महाराष्ट्राने कायमच देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. आजही महाराष्ट्र सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून छत्रपती शिवरायांच्या विचारांनी चालणारा राष्ट्रवादी तरुण या भूमीतून निर्माण होत आहेत. आजही अनेक सैतानी शक्ती हिंदूंच्या मुळावर उठलेल्या आहेत. परंतु छत्रपती शिवरायांचे विचार धारण केलेल्या तरुणांनी त्यांच्या विरोधात उभे राहिले तर या शक्ती देशाचे काही वाकडे करू शकत नाहीत.
मोहन गुजराथी म्हणाले, त्याग, सेवा, समर्पण या त्रिसूत्रीचा मंत्र मानून राजे शिवराय प्रतिष्ठान कार्य करत आहे. त्यांच्या या कार्याचा आजच्या सर्व तरुणांनी आदर्श घेणे गरजेचे आहे. शिवजयंतीच्या माध्यमातून आजही सामाजिक जागरणाची गरज आहे, केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करून स्मरण करण्यापेक्षा त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीमध्ये आणून आपण एक वैभव शाली राष्ट्र निर्माण करू शकतो.
महेश पवळे म्हणाले, छत्रपती शिवराय यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी गेल्या वीस वर्षांपासून शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे. या माध्यमातून हिंदुत्ववादी विचार असणारे तरुण निर्माण केले जात आहेत. आज पुण्येश्वर मंदिराच्या ठिकाणी मशिद उभी आहे. परंतु त्या ठिकाणी जेव्हा भगवान महादेवाचे मंदिर उभे राहील तरच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी केली असे वाटेल.
दि. १७ मार्च पर्यंत दररोज विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रमांचे आयोजन संस्थापक महेश पवळे, अध्यक्ष अतुल गोणते, उत्सव प्रमुख अमित जाधव यांसह कार्यकर्त्यांनी केले आहे. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अक्षय मुळे यांनी सूत्रसंचालन केले. महेश पवळे यांनी प्रास्ताविक केले.