
पुणे . सहकार विषयासंदर्भात यापूर्वी केंद्र शासनाशी संबंध येत नव्हता. सर्व अडी-अडचणींसंदर्भात आम्ही राज्य शासनाशी संपर्कात असायचो. मात्र, सन २०१८ पासून केंद्राशी संबंधात आहोत. दररोज चांगले निर्णय होत आहेत. सहकार क्षेत्राला केंद्र शासनाचे मोठे पाठबळ आहे. नवनवीन ठिकाणी नागरी सहकारी बँकांची स्थापना व्हावी, याकरिता केंद्र शासन प्रयत्नशील असून सहकार्य देखील करीत असल्याचे मत राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे यांनी व्यक्त केले.
पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन लि., पुणे (महाराष्ट्र) च्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ‘सहकारी बँकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता- एक गेम चेंजर’ या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन हॉटेल शेरेटन ग्रँड येथे करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य हौसिंग सोसायटी फेडरेशनचे लि. चे अध्यक्ष सुहास पटवर्धन, पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, संचालक निलेश ढमढेरे, रमेश वाणी, बाळकृष्ण उंदरे, मंगला भोजने, डॉ. प्रिया महिंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेळके आदी उपस्थित होते.
परिषदेचे उद्घाटन सहकार व तंत्रज्ञानरुपी रोपाला पाणी घालून करण्यात आले. कार्यक्रमात सहकार क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले नवनियुक्त आमदार हेमंत रासने, पुणे बार असोसिएशनचे नवनियुक्त अध्यक्ष अॅड.हेमंत झंझाड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध भागातील ३५० बँकांच्या प्रतिनिधींचा सहभाग या परिषदेमध्ये होता.
दीपक तावरे म्हणाले, सहकारी बँकांची क्षमता केवळ आकडयांमध्ये न मोजता त्यांचे सोशल आॅडिट होणे गरजेचे आहे. सर्व प्रकारचे धोके पत्करुन गरजूंना या बँका मदत करतात. यातून मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य उभे रहात आहेत. सहकारी बँकांची ही चांगली बाजू लोकांसमोर यायला हवी. आता आपण डिजिटल क्षेत्रात गेलो आहोत. सेवा आणि नोंदी या डिजिटल स्वरुपात द्यायला हव्या. एआय च्या माध्यमातून परदेशात अनेक ठिकाणी व्यवहार सुरु आहेत. त्याप्रमाणे आपण देखील यातून पुढचे पाऊल टाकायला हवे.
हेमंत रासने म्हणाले, बँकिंग क्षेत्रातील अडचणी आपल्याला माहित आहेत. केंद्र सरकारला सहकार व ही चळवळ वाढवायची आहे. त्यामुळे सहकार खात्याची निर्मिती करण्यात आली. सर्वसामान्यांना बँकिंग खुले करणारे हे क्षेत्र असल्याने केंद्राचे सहकाराकडे विशेष लक्ष आहे. सहकाराशिवाय उद्धार नाही, असे आपण मानतो. त्यामुळे सहकार वाढविणे आणि टिकविणे हे आपले काम असल्याचे त्यांनी सांगितले. सुहास पटवर्धन म्हणाले, आपल्याकडे मूळ बुद्धिमता आहे. एआय मुळे नोक-या जातील, असे अनेकांना वाटत आहे. त्यामुळे एआय सारख्या कृत्रिम बुद्धीमत्तेचा योग्य वापर केल्यास कोणाच्याही नोक-या जाणार नाहीत.
अॅड.सुभाष मोहिते म्हणाले, सहकारात सहकार हा मंत्र जपण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. बँकिंगमध्ये सर्वत्र डिजिटायझेशन सुरु आहे. यामध्ये आता एआय चे नवे पर्व सुरु होत आहेत. त्यात आपण मागे राहता कामा नये. पूर्वी बँकेत येऊन प्रत्यक्ष काम चालत होते. मात्र, आता ग्राहकांचे बँकेत येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बँकेत न जाता बँकिंग करण्याची सवय आहे. शाखा बँकिंग राहिल की नाही, हा प्रश्न देखील आहे. नागरी सहकारी बँकांच अस्तित्व टिकवणे, हा अशा परिषदांचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसाद भारदे यांनी सूत्रसंचालन केले. निलेश ढमढेरे यांनी आभार मानले.