चुनावताजा खबरपुणे

पक्षाने संधी दिल्यास शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणार : मनिष आनंद

शिवाजीनगरमध्ये परिवर्तनासाठी जनता सज्ज असल्याचा केला दावा

Spread the love

पुणे . गेल्या दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात मूलभूत सोयीसुविधांचा बोजवारा उडाला आहे. जनतेनं मोठ्या विश्वासानं दोनवेळा भाजपच्या हातात सत्ता दिली मात्र भ्रष्ट नेत्यांनी या मतदार संघाचं अक्षरश: वाटोळे केले आहे. निष्क्रिय आणि अकार्यक्षम लोकप्रतिनिधींमुळे हा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत खूप मागे पडला आहे, अशी खंत मनिष आनंद यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

आता विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. पाच वर्षे गायब असलेले आमदार पुन्हा आता प्रकट होतील आणि नेहमीप्रमाणेच आश्वासनांचा पाऊस पाडतील. मतदारांना आमिषं दाखवतील. पण जनता सुज्ञ आहे. मतदारराजा पुन्हा पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही, याची मला खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मनिष आनंद हे शिवाजीनगर मतदार संघात कॉंग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. आज शिवाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली.

मनिष आनंद म्हणाले की,शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील समस्यांची मला जाण आहे. खडकी छावणी परिषदेचा सदस्य म्हणून १२ वर्षे काम पाहिले आहे. तसेच उपाध्यक्ष म्हणून ६ वर्षांचा अनुभव आहे. याशिवाय पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच स्व. सुरेंद्र आनंद मेमोरिअल फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी कामे करत आहे. सर्वसामान्यांमध्ये जाऊन काम करणारा नेता म्हणून लोकांशी नाळ जुळलेली असल्याचेही मनिष आनंद यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, गेल्या १० वर्षांत शिवाजीनगर मतदारसंघातील नागरी प्रश्न अधिक बिकट बनले आहेत. प्रंचड वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, अपूरा पाणीपुरवठा, कच-यांचे ढीग, वाढती गु्न्हेगारी, प्रदुषण अशा नागरी प्रश्नांनी शिवाजीनगर मतदारसंघाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शिवाजीनगरमध्ये परिवर्तन हवे आहे.

हा मतदारसंघ पुण्याच्या मध्यभागी येतो. या भागात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला सोयीसुविधा पुरविण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे समस्यांचा डोंगर वाढतच चालला आहे. शहरी भागात वाहतूक कोंडीसारखा विषय खूपच संवेदनशील बनला आहे. यासाठी मेट्रोचे कारण पुढे केले जात असले तरी प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित होते. मात्र १० वर्षात सत्ताधाऱ्यांना तेही करता आले नाही. मतदारसंघात एकही सरकारी हाॅस्पिटल नाही, येथील नागरिकांना ससून किंवा खासगी हाॅस्पिटल्सवर अवलंबून राहावे लागते. या मतदार संघात पाण्याचा मोठा प्रश्न आहे. नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. जो लोकप्रतिनिधी दहा वर्षात नागरिकांच्या रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही, ते मतदार संघाचा सर्वांगीण विकास करू शकतील? असा सवालही मनीष आनंद यांनी केला.

शिवाजीनगर मतदार संघाला लागलेलं हे ग्रहण सोडविण्यासाठी कॉग्रेसच्या माध्यमातून मला काम करायचे आहे. जनतेने पाहिलेले मतदार संघाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करायचे आहे. केवळ सत्तेच्या मागे लागलेल्या लोकप्रतिनिधींना याचाही विसर पडला आहे की, आपण ज्या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहे, त्याचं नाव शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ ‘ आहे. हिंदुत्वाचा डंका पिटणाऱ्या भाजपाला मतदारसंघाचे नाव बदलून ते ‘छत्रपती शिवाजीनगर’ करावे, असे कधीच का वाटले नाही? कारण त्यांचे हिंदुत्व खोटे आणि फक्त मते मिळविण्यापुरतेच आहे. निवडणुका आल्या की त्यांचे हिंदुत्व जागे होते आणि मते मिळाली की सोयीस्करपणे सगळं विसरून जातात. मला संधी मिळाली तर मी पहिल्यांदा मतदार संघाचे नाव बदलून ते छत्रपती शिवाजीनगर असे करेन.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार व्हावेत यासाठी मला असं एक स्टेडियम उभारायचं आहे, जिथं सर्व प्रकारच्या खेळांचे तंत्रशुध्द प्रशिक्षण मिळेल. जिथं खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक असतील. अत्याधुनिक सोयीसुविधा असतील. मतदारसंघात मूलभूत प्रश्न जैसे थे आहेत. वस्तीसुधाराचे महत्वाचे काम करायचे आहे. महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा राहिला असल्याने महिला प्रशिक्षण केंद्राचीही उभारणी करणार असल्याचे मनिष आनंद म्हणाले.

वसाहतीकरण, आर्थिक विकास, बेरोजगारी, व्यवसायिकरण वाढलं आहे. मात्र लोकप्रतिनिधीचे जनतेच्या प्रश्नांकडे अजिबात लक्ष नाही. जनतेनं आपल्याला दोनवेळा आमदार केलं, आता तिसऱ्या वेळेला पण आपणच निवडून येऊ, अशा भ्रमात ते आहेत. मात्र ते विसरले आहेत की, लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला शिवाजीनगरमधून अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. विश्वासघात करणाऱ्यांना जनता कधीच माफ करत नाही असंही मनीष आनंद म्हणाले. शिवाजीनगर मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. एक नागरिक म्हणून मला प्रामाणिकपणे वाटतं की जनतेला सुखी, समाधानी आणि सुरक्षित जीवनाचा आनंद घेता यावा. त्यासाठी काम करणार असल्याचे मनीष आनंद यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button