पुणे : दिवाळी हा आनंद आणि उत्साहाचा सण आहे. त्यातच दि पुना मर्चंटस् चेंबरच्या लाडू-चिवडा उपक्रमामुळे सर्वसामान्यांची दिवाळी दरवर्षी गोड होते. या उपक्रमाच्या माध्यमातून व्यापारी आनंद वाटण्याचे काम करत आहेत. अशा भावना सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी गुरूवारी व्यक्त केल्या.
दि पुना मर्चंटस् चेंबरतर्फे राबविण्यात येणार्या रास्त दरातील लाडू-चिवडा उपक्रकाचे काल उदघाटन झाले, त्यावेळी तावरे बोलत होते. यावेळी पणन संचालक विकास रसाळ, बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर, मर्चंट चेंबर अध्यक्ष रायकुमार नहार, माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया, सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, उत्तम बाठीया आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तावरे म्हणाले, लाडू-चिवडा उपक्रमात पदार्थ तयार करताना सर्वप्रकारची काळजी घेतली जात आहे. हे पदार्थ र्जेदार होण्यासाठी त्यामागे खूप जणांचे कष्ट आहेत. सामाजिक उपक्रमात कायम अग्रेसर असणारी संस्था म्हणून दि पुना मर्चंटस चेंबरची ओळख आहे. सामाजिक जाणिवेतून गोरगरिबांसाठी हा उपक्रम राबवला जातो. ही गोष्ट खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे.
विकास रसाळ म्हणाले, एखादा सामजिक उपक्रम सातत्याने 37 वर्ष चालू ठेवणे ही सोपी गोष्ट नाही. इतर व्यवसायात व्यापारी व्यावहारिक राहतात. परंतु सामाजिक कामात मात्र व्यापारी सर्वात पुढे असतात. लाडू -चिवडा उपक्रमामुळे सर्वसामान्य व गोरगरिब वाट पहात असतात. या उपक्रमांमुळे त्यांची दिवाळी गोड होत असते.
डॉ. राजाराम धोडकर म्हणाले, या उपक्रमाच्या माध्यमातून व्यापारी सामाजिक बांधिलकी जपत आहेत. या बांधिलकीच्या नात्यातून इतरांची दिवाळी गोड करण्याचे हे कार्य आदर्शवत आहे. हा उपक्रम म्हणजे आनंद वाटण्याचा उपक्रम आहे. राजेंद्र बाठिया व रायकुमार नहार यांनी मनोगत व्यक्त केले. ईश्वर नहार यांनी स्वागत केले. उत्तम बाठीया यांनी सुत्रसंचालन केले. आशिष दुगड यांनी आभार मानले, अशी माहिती दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष नहार यांनी दिली.