एआय तंत्रज्ञानाची तुलना अणुउर्जेशी केली जात आहे* लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस (निवृत्त) यांचे प्रतिपादन
*एआय तंत्रज्ञानाची तुलना अणुउर्जेशी केली जात आहे*
लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस (निवृत्त) यांचे प्रतिपादन ; स्नेह-सेवा व मैत्रेय चॅरिटेबल सोसायटीतर्फे ‘सैनिक-स्नेह’ या प्रकल्पांतर्गत दिवाळीनिमित्त सीमेवरील सैनिकांसाठी दिवाळी फराळ
पुणे : आज लढाईचे तंत्र बदलत आहेत. आजचे बदलते तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा योग्य वापर देखील युध्दात होत आहे. आजच्या तंत्रज्ञानाचा विचार केला असता आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर जो प्रभुत्व मिळवू शकेल तो जगावर प्रभुत्व मिळवू शकेल असे मानले जाते. एआय तंत्रज्ञानाची तुलना ही अणु उर्जेशी केली जाते. आज एआय तंत्रज्ञानाचा वापर चीन मध्ये सर्वाधीक केला जात आहे, तंत्रज्ञानाच्या बाबातीत भारताने देखील खूप प्रगती केली असून आणिखी प्रगती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस (निवृत्त) यांनी केले.
स्नेह-सेवा व मैत्रेय चॅरिटेबल सोसायटीतर्फे ‘सैनिक-स्नेह’ या प्रकल्पांतर्गत दिवाळीनिमित्त देशाच्या सीमावर्ती भागातील जवानांना दिवाळी फराळ पाठविण्यात आला. नवी पेठेतील निवारा सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी चितळे बंधू मिठाईवाले उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राधा संगमनेरकर, सचिव नीला सरपोतदार सैनिक स्नेह प्रकल्प प्रमुख डॉ.दिनेश पांडे, सुधीर पळसुले, अविनाश जोशी, सुनिता वाघ आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी चितळे बंधू उद्योग समूहाचे प्रमुख श्रीकृष्ण चितळे आणि देणगीदार यांनी सहकार्य केले .यावेळी सुदर्शन हसबनीस यांनी आधुनिक युद्धतंत्र आणि भारत या विषयावर मार्गदर्शन केले.
सुदर्शन हसबनीस म्हणाले, आज युध्दभूमीवर ड्रोनचा वापर वाढताना दिसत आहे. संरक्षणाच्या सर्व कवचाला भेदून ड्रोन आणि मिसाईल्स हल्ला करू शकतात. जिथे पोहचणे अशक्य होते त्या ठिकाणी जावून ड्रोन हवी असणारी माहिती मिळवू शकतो आणि युध्दासाठी आवश्यक असणाऱ्या इतर अनेक गोष्टी साध्य करीत आहे. भारत देशावर कोणी हल्ला केला तर त्याला प्रतिउत्तर देण्याइतकी साधने भारताकडे आहेत. त्याचबरोबर शत्रूला हरवण्याइतकी ताकद देखील भारताकडे आहे. परंतु ती ताकद आणखी वाढवून तंत्रज्ञानात प्रगती करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
उपक्रमाचे यंदाचे २९ वे वर्ष होते. संस्थेच्यावतीने तब्बल ६ हजार दिवाळी फराळ बॉक्स जम्मू आणि काश्मीर, तवांग आणि दिब्रुगड या सीमेवरील जवानांसाठी पाठविला आहे. त्याचबरोबर भेटकार्ड देखील आहेत. कार्यक्रमात विविध बटालियनच्या जवानांना पाहुण्यांच्या हस्ते मिठाई व संस्थेतील मुलांनी बनविलेले भेटकार्ड देण्यात आले, अशी माहिती डाॅ. राधा संगमनेरकर यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य श्याम भुर्के यांनी केले. प्रास्ताविक डॉ.राधा संगमनेरकर.. यांनी केले. आभार नीला सरपोतदार यांनी मानले.