चुनावताजा खबरपुणेमराठी

कसबा मतदारसंघात एकजुटीने रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी उभे रहा

शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांचे कसब्यातील नियोजन मेळाव्यात आवाहन

Spread the love

जागरूक राहून महाविकास आघाडीचा विजय साकारावा

 

पुणे. विधानसभेची ही निवडणूक महाराष्ट्राच्या आणि पुण्याच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी अत्यंत दक्ष राहून महाविकास आघाडीचा विजय साकारला पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मतदान तंत्र, विरोधकांकडून होणारे संभाव्य गैरप्रकार याबाबत अत्यंत जागृत राहण्याची गरज आहे. घराघरात जाऊन लोकांशी व्यक्तिगत संपर्क ठेवण्यावर कार्यकर्ते जितका भर देतील तितकी ही निवडणूक आपल्याला सोपी होत जाईल, असे प्रतिपादन शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले आहे. कसबा मतदारसंघात एकजुटीने धंगेकर यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी केले

कसबा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार नियोजनासाठी आप्पा बळवंत चौकातील सोमवंशीय आर्य क्षत्रिय समाज ट्रस्ट कार्यालयात आयोजित बैठकीत अरविंद शिंदे बोलत होते. यावेळी रवींद्र धंगेकर, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, अभय छाजेड, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, अंकुश काकडे, अण्णा थोरात, रवींद्र माळवदकर, गणेश नलावडे, काँग्रेस युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, जावेद खान, अक्षय माने, हेमंत राजभोज, प्रवीण करपे, साहिल राऊत, जयसिंग भोसले, अजिंक्य पालकर, किरण कद्रे इत्यादी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या कार्यपद्धतीबाबत कार्यकर्त्यांना पक्षातर्फे प्रशिक्षण देऊन सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. रवींद्र धंगेकर म्हणाले, कसबा विधानसभा मतदार संघात आमदार म्हणून आपल्याला जेमतेम दीड वर्षाचा अवधी मिळाला, परंतु या दीड वर्षाच्या अवधीत अथक परिश्रम करून अनेक विकास कामे मार्गी लावल्याचे मला समाधान आहे. तथापि आता याहीपेक्षा अधिक व्यापक प्रमाणावर विकास कार्य करण्यासाठी आपल्याला कसब्यात पुन्हा विजय मिळवावा लागेल .

धंगेकर पुढे म्हणाले, सुरुवातीच्या काळात आपल्या मतदारसंघातील विकास निधी अन्यत्र वळवण्याचा प्रयत्न झाला पण तरीही जिद्दीने आपण हा निधी परत मिळवण्यासाठी संघर्ष केला आणि शक्य तितकी विकास कामे मार्गी लावली. कसब्यात अजून बरेच काही करायचे आहे. त्यासाठी पुढील पाच वर्ष महत्त्वाची आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस व सर्व मित्र पक्षांच्या मदतीने आपण निश्चित विजय साकार करू असा विश्वास धंगेकर यांनी यावेळी व्यक्त केला. शहरात घडलेले पॉर्शे कार अपघात प्रकरण, शहराला पडलेला मादक द्रव्यांचा विळखा इत्यादी विषयांवर आपण आक्रमकपणे भूमिका मांडल्याची माहितीही धंगेकर यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते अंकुश काकडे, चंदन साळुंके, विजय खराडे इत्यादींची भाषणे झाली. सर्वांनीच एकजुटीने कसब्यात विजय मिळवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. ही निवडणूक मैदानावर तर लढायची आहेच, पण त्याहीपेक्षा निवडणुकीतील संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातून केले जाणारे घोटाळे टाळण्यासाठी अधिक दक्षतेने कार्यरत राहण्याची गरज सर्वच वक्त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक कार्यकर्त्यांनी किमान 20 घरांशी सातत्याने संपर्क साधून घराघरात पुन्हा धंगेकर यांचे नाव पोचवण्यासाठी नियोजनबद्धपणे प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन यावेळी केले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button