पुणे .विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेमध्ये माध्यम कक्षाची भूमिका अत्यंत महत्वाची असून निवडणूक प्रक्रिये दरम्यान माध्यम कक्ष समन्वय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निरपेक्षपणे व पारदर्शकपणे कामकाज करावे असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षाला डॉ.पुलकुंडवार यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुहास दिवसे, निवडणूक उपजिल्हाधिकारी मिनल कळसकर, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्ष समन्वयक डॉ.रविंद्र ठाकूर, निवडणूक शाखेच्या तहसीलदार शितल मुळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे सहायक प्राध्यापक योगेश बोराटे,सहायक संचालक जयंत कर्पे यावेळी उपस्थित होते.
विविध माध्यमांमधील जाहिराती आणि पेड न्यूजबाबत कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती डॉ.पुलकुंडवार यांनी घेतली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाविषयी माहिती दिली.
जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्ष समन्वय अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, सहायक संचालक जयंत कर्पे यांनी माध्यम कक्षातर्फे तयार करण्यात येणाऱ्या विविध अहवालांची माहिती दिली.
माध्यम कक्षात सुमारे १० दूरचित्रवाणी संचांच्या माध्यमातून वृत्तवाहिन्यांतील निवडणूक प्रचार, जाहिरात, पेड न्यूज आदींच्या अनुषंगाने संनियंत्रण केले जात आहे. तसेच सोशल मीडियावरील पोस्टबाबतही बारकाईने संनियंत्रण केले जात आहे. वृत्तपत्रातील जाहिराती आणि पेड न्यूजबाबतही दररोजच्या वृत्तपत्रांचे अवलोकन केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
विधानसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सी-व्हीजील आणि निवडणूक खर्च कक्षालाही विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार यांनी भेट दिली.