पुणे .पारलिंगी नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागृतीकरीता व्हावी यासाठी समाज कल्याण सहायक आयुक्त आणि श्री महालक्ष्मी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महालक्ष्मी मंदिर धानोरी ते राजमाता जिजाऊ भाजी मंडई धानोरी दरम्यान रॅलीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे, समाज कल्याण निरीक्षक गोपिचंद आल्हाट, महेश गवारी, श्री महालक्ष्मी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लखन ओव्हाळ तसेच पारलिंगी नागरिक उपस्थित होते.
श्री. लोंढे यांनी रॅलीमध्ये उपस्थित असणाऱ्या पारलिंगी व्यक्तींना मतदार कार्डचे महत्त्वाविषयी माहिती दिली. सर्वांसारखेच आपणही देशाचे नागरिक असल्याने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावावा. देशाचे सुजाण नागरिक म्हणून मतदान करुन आपली जबाबदारी पार पाडावी. पारलिंगी व्यक्तींनी परिचयाच्या पारलिंगी व्यक्तींना विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्याबाबत प्रोत्साहित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.