डॉ. फराह अनवर हुसैन शेख, अध्यक्ष, मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशन
पुणे.बोपोडी हा पुणे शहरातील एक महत्त्वाचा आणि वर्दळीचा भाग आहे. विविध क्षेत्रांत योगदान देणारे लोक येथे राहतात, आणि या भागात अनेक समस्या असूनही त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले दिसते. आगामी शिवाजीनगर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही बोपोडीतील समस्या उचलून धरत आहोत. प्रत्येक समस्येवर उपाय सुचवण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून स्थानिक नागरिक आणि नेत्यांना याविषयी जागरूकता निर्माण होईल.
आजच्या लेखाचा विषय आहे – बोपोडीतील अपुऱ्या वैद्यकीय सुविधांची समस्या
बोपोडी व आसपासच्या भागातील नागरिकांना आपत्कालीन वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. शहरात एक संपूर्ण सुविधा असलेले रुग्णालय नसल्याने नागरिकांना वेळेवर उपचार मिळवणे अवघड होते. संजय गांधी महानगरपालिका रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी अद्याप त्यात संपूर्ण सेवा सुरू झालेली नाही. शिवाय, मेट्रो स्टेशनजवळ असलेले रुग्णालय आधी सह्याद्री हॉस्पिटलला दिले होते; परंतु करार संपल्यावर ते पुन्हा महानगरपालिकेच्या ताब्यात आले, मात्र आवश्यक सुविधा अद्याप मिळालेल्या नाहीत.
मुंबई-पुणे महामार्गावर कसारवाडीपासून वाकड़ेवाडीपर्यंत अपघात झाल्यास तत्काळ उपचारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. बोपोडीतील रहिवाशांना अपत्कालीन परिस्थितीत यासीएम हॉस्पिटल किंवा खडकी कँटोन्मेंटमधील बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात जावे लागते. रात्रीच्या वेळी आणीबाणीची गरज भासल्यास या भागातील नागरिकांसाठी कोणतीही तातडीची सुविधा नसल्याचे गंभीर वास्तव आहे.
गर्भवती महिलांसारख्या आपत्कालीन स्थितीत तत्काळ उपचार मिळवण्यासाठी एकही अद्यावत रुग्णालय उपलब्ध नाही. रात्रीच्या वेळी आणीबाणीची गरज भासल्यास, या भागातील नागरिकांना असलेल्या असुविधेचे गांभीर्य लक्षात येते.
बोपोडी व त्याच्या आसपासच्या भागात एक पूर्ण-उत्पन्न रुग्णालय उपलब्ध नसल्याने अनेकदा आपत्कालीन वैद्यकीय सुविधा मिळवणे कठीण ठरते. गर्भवती महिलांसाठी ही समस्या अधिक गंभीर आहे. जर कोणत्या गर्भवती महिलेला सामान्य प्रसूतीऐवजी सर्जरीद्वारे प्रसूतीची गरज भासली, तर येथे त्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत गर्भवती महिलेला तातडीने ससून रुग्णालयात किंवा वाईसीएम रुग्णालयात हलवावे लागते, जे आणखीच धोकादायक ठरू शकते. वेळेवर उपचार न मिळाल्यास प्रसूतीदरम्यान गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.
या समस्येवर उपाययोजना करण्याची वेळ आता आलेली आहे. येत्या निवडणुकांमध्ये जेव्हा एखादा नेता तुमच्या घरात किंवा भागात येईल, तेव्हा त्यांना या समस्येविषयी नक्की विचार करा. आपल्या भागातील नागरिकांसाठी संपूर्ण वैद्यकीय सुविधा असलेले रुग्णालय हे आता एक मागणी नसून गरज आहे.