पुणे : पथविक्रेत्यांच्या हक्कांचे रक्षण होण्यासाठी तसेच पथविक्रेते आणि त्यांच्या कुटुंबीयांना हक्काचा रोजगार मिळून त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी पथविक्रेता, उपजीविका, सरसाधनांचे रक्षण या कायद्यांतर्गत पथविक्रेता योजनेची सरकारकडून अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी सोमवारी दिले. पथविक्रेता कायदा, पथविक्रेता योजना आणि पथविक्रेता धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मी वचनबद्ध आहे, असे बागवे यांनी जाहीर केले.
कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील पथविक्रेत्यांची रमेश बागवे यांनी सोमवारी भेट घेऊन चर्चा केली. जाणीव संघटना प्रणीत जाणीव हातगाडी, फेरीपथारी आणि स्टॉलधारक संघटनेने कार्यवाह संजय शंके यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश बागवे यांना पाठिंबा जाहीर केला. संघटनेच्या अध्यक्षा श्वेता ओतारी, उपाध्याय कैलास बोरगे, विभागीय अध्यक्ष विनायक दहीभाते, विभागप्रमुख विशाल खुडे व जगन्नाथ घोलप आणि भवानी पेठ विभागप्रमुख किशोर शिंदे यांनी पाठिंब्याचे पत्र रमेश बागवे यांना दिले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जाणीव संघटनेच्या वतीने उमेदवार उभा राहिल्यास त्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेन, विधानसभेत जाणीव संघटनेच्या मागण्या मांडून त्यास मान्यता मिळण्यासाठी संघर्ष करेन, असे आश्वासन बागवे यांनी यावेळी दिले. पथविक्रेता कायदा, पथविक्रेता योजना, पथविक्रेता धोरणाची कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात अंमलबजावणी व्हावी, यासाठी रमेश बागवे यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे ओतारी यांनी सांगितले. संघटनेच्या वतीने बागवे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ सोमवारी सकाळी संत कबीर चौक, क्वार्टर गेट, पेन्शनवाला मशीद, रास्ता पेठ, पॉवर हाऊस, समर्थ पोलिस ठाणे, सोमवार पेठ पोलिस वसाहत, बरके आळी आणि नरपतगिरी चौक येथे पदयात्रा उत्साहात पार पडली. साचापीर स्ट्रीट, उमरशहा दर्गा, सुप्रिया व सागर सोसायटी, ताबूत स्ट्रीट, कमरुद्दीन मशीद मोहल्ला, महात्मा गांधी रस्ता येथे सायंकाळी कार्यकर्त्यांच्या गर्दीत पदयात्रा निघाली. पेढे वाटून आणि फटाके फोडून स्थानिक कार्यकर्त्यांनी बागवे यांचे स्वागत केले. महिलांनी रमेशदादा यांचे औक्षण करून त्यांना विजयाचा विश्वास दिला.
याप्रसंगी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, सुजाता शेट्टी, प्रा. वाल्मीकी जगताप, राजीव अरोरा, अशोक लांडगे, वैष्णवी किराड, मुन्ना खंडेलवाल, सुजित जाधव, असिफ शेख, विठ्ठल थोरात, रवि आरडे, विजय वारभवन, सय्यद शेख, नुरुद्दीन सोमजी इत्यादी सहभागी झाले होते.