ताजा खबरपुणे

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून म्हातोबा टेकडीची पाहाणी

झाडांच्या सुरक्षेसाठी १३ जानेवारी रोजी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

Spread the love

चंद्रकांतदादा संतापले, टेकड्या जाणाऱ्या विकृतींना चाप बसवा!

पुणे. कोथरुड मधील म्हातोबा टेकडीवरील आगीच्या घटनेमुळे चंद्रकांत  पाटील संतप्त झाले असून; अशा विकृतींना चाप बसविण्याचे निर्देश आज पुन्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच, झाडांच्या सुरक्षेसाठी उपाय योजनांसंदर्भात १३ जानेवारी रोजी वन विभागाच्या मुख्यालयात बैठक घेऊन सविस्तर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त कोथरुडमधील म्हातोबा, पाषाण, महात्मा टेकडीवर औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात अतिशय महत्वाचे ठरणारे वृक्षांची लागवड केली. गेल्या आठवड्यात तीन वेळा म्हातोबा टेकडीवर येणाऱ्या काही टवाळखोरांनी आग लावून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्या पार्श्वभूमीवर आज नामदार पाटील यांनी घटनास्थळाची पाहाणी करुन आढावा घेतला.

यावेळी वन विभागाचे अधिकारी मुख्य वन संरक्षक मनोज बारबोले, सहाय्यक उप वन संरक्षक दिपक पवार, भाजपा कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, सरचिटणीस दिपक पवार, दिलीप उंबरकर, सचिन मोकाटे, म्हातोबा टेकडी ग्रुपचे दामोदर कुंबरे, रोहिदास सुतार, दंडवते मारुती टेकडी ग्रुपचे संजीव उपळेकर, गणेश आंग्रे, जयंतराव पेशवे, राजू इनामदार, तात्यासाहेब निकम, विश्वास कुलकर्णी, निसर्गप्रेमी रमेश दांडेकर यांच्या सह अनेक पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.

या पाहाणी वेळी मुख्य वन संरक्षक मनोज बारबोले यांनी घटनेची माहिती नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना दिली. त्यावर घटना घडू नये; यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, अशी विचारणा केली. त्यावर मनुष्यबळ अभावामुळे अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यात मर्यादा येत असल्याचे अधिकाऱ्यांनी नामदार पाटील यांच्यासमोर स्पष्ट केले. त्यावर लोकसहभागातून मनुष्यबळ उपलब्ध करुन देऊ; अशी ग्वाही यावेळी ना. पाटील यांनी दिली.

झाडांच्या सुरक्षेसाठी टेहळणी बुरुज उभारणे, रात्रीच्या सुमारास अशा घटना टाळण्यासाठी म्हातोबा मंदिर परिसरात सौर ऊर्जेद्वारे पथदिवे कार्यान्वित करणे, झाडांची निगा राखण्यासह वाळलेले तण काढण्यासाठी मनुष्यबळ वाढविणे, पर्यावरण संवर्धनासाठी कॅम्प उपक्रम राबविणे, टेकडींवर गुरांना चराईवर नियंत्रण आणणे, यांसह दुपार आणि संध्याकाळच्या सत्रात संपूर्ण भागात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची गस्त वाढविणे आदी सूचना करण्यात आल्या.

त्यावर लोकसहभागातून मनुष्यबळ वाढविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी ना. पाटील यांनी दिली. तसेच, गस्त वाढविण्यासाठी होमगार्डची मदत घ्यावी अशी सूचना त्यांनी केली. त्यासोबतच झाडांच्या सुरक्षेसाठी प्रशासनासमोरच्या इतर अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यासाठी १३ जानेवारी रोजी बैठक घेणार असल्याचेही स्पष्ट केले. यामध्ये प्रशासन आणि पर्यावरण प्रेमींसोबत संवाद प्रस्थापित करुन; वृक्ष संवर्धनामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button