पुणे. येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणे येथे नवीन वर्षाची सुरुवात एकात्मता आणि प्रेरणादायी ऊर्जेसह माजी विद्यार्थी मेळाव्याने करण्यात आली. या मेळाव्याच्या निमित्ताने 100 हून अधिक माजी विद्यार्थी आपल्या मातृसंस्थेत परतले. एलुमनाई असोसिएशन (एमएए) यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश “विकसित भारत 2047” या संकल्पनेवर आधारित होता. या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी राष्ट्र उभारणीसाठी सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या मेळाव्याचे उद्घाटन एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डॉ. सुनीता कराड, प्र.कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे संचालक डॉ. वीरेंद्र व्ही. शेटे, डाॅ.सुराज भोयर, प्रा. हर्षित देसाई, डॉ. संकेत बापट, डॉ. संदीप गायकवाड आणि डॉ. रीना पगारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
एमआयटी-एडीटी माजी विद्यार्थी संघटनेचे प्रमुख डॉ. सुराज भोयर हे सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना म्हणाले, “एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे अभिमानी प्रतिनिधी म्हणून आमचे माजी विद्यार्थी संस्थेच्या परंपरेचे आणि प्रगतीचे खरे आधारस्तंभ आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला, भारताला 2047 पर्यंत विकसित करण्याचा संकल्प करताना आपण नवकल्पनांवर भर देत, सातत्यपूर्ण कृतीने सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले पाहिजे.”
विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाबद्दल आपले अनुभव शेअर केले आणि एमआयटी-एडीटी विद्यापीठाने त्यांच्या यशाचा पाया कसा घातला हे सांगितले. तसेच, अनेक विद्यार्थ्यांनी “विकसित भारत” मिशन अंतर्गत सामाजिक प्रगती व नवकल्पनांसाठी योजना सादर केल्या.