- लोणी काळभोर .सनई चौघाड्यांचे मंगलमय सुर.., तुतारी, मराठमोळ्या नऊवारी साडीतील महिला आणि मराठी परंपरेला साजेशा पद्धतीने औक्षण, फुलांचा वर्षाव, रांगोळ्यांच्या पायघड्या आणि घरावर गुढी अशा पारंपारिक पद्धतीने आज वाकवस्ती, लोणी काळभोर येथे नवजात बालकाचे मोठ्या उत्साहात त्याच्या आई वाडिलांसाह नातेवाईकांनी स्वागत केले.
युवा उद्योजक इंद्रजीत अभय काळभोर आणि त्यांच्या पत्नी जान्हवी यांना नुकतेच पुत्ररत्न प्राप्त झाले. घरातील नव्या सदस्याचे स्वागत करताना अलीकडे डीजे, फटाके यांचा अतिरेक केला जातो मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत जान्हवी आणि इंद्रजीत यांनी आपल्या बाळाचे स्वागत पारंपारिक पद्धतीने करायचे असे ठरवले होते, त्यानुसार त्यांनी आज मोठ्या उत्साहात आपल्या बाळाचे घरी स्वागत केले.
या विषयी बोलताना इंद्रजीत काळभोर म्हणाले, बाळ येणार यांची चाहूल लागल्यानंतर प्रत्येक घरात जसे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असते तसेच आमच्याकडे होते. आपल्या बाळाचे घरी आगमन होताना कसे स्वागत करायचे याचा आम्ही विचार करत असताना मुलगी झाली तर आणि मुलगा झाला तर कसे स्वागत करायचे या दोन्हींचा विचार आम्ही करून ठेवला होता. त्यानुसार आज आम्ही प्रभू रामचंद्र किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जसे स्वागत झाले असेल त्याच पद्धतीने राजेशाही थाटात, पारंपारिक मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केले. जान्हवी यांच्या माहेरून निघताना बाळाच्या स्वागतासाठी आमच्या मित्रपरिवारातील 500 हून अधिकजण मोठ्या उत्साहात 200 दुचाकी आणि 50 चारचाकी वाहनांसह सहभागी झाले होते असेही इंद्रजित काळभोर यांनी सांगितले.