मराठी
दिवसभर बसून काम केल्याने ३०-४५ वयोगटातील २०% तरुणांमध्ये सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसची समस्या*

सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस हा एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये पाठीच्या कण्याला सूज येते. हा रोग प्रामुख्याने मानेच्या मणक्याला प्रभावित करतो. सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस हा एक जीवनशैलीचा आजार आहे. ही समस्या स्पाईनचा सर्वात वरच्या भाग सर्व्हायकल स्पाईनमध्ये उद्भवते. म्हणूनच याला सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस म्हणतात. २०% तरुण प्रौढांना बैठी जीवनशैली,शारीरीक हलचालींचा अभाव आणि चुकीच्या पध्दतीने बसणे व झोपल्याने मणक्याच्या विकाराने ग्रासले आहे. मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये घालवलेले तास, वाढता स्क्रीन टाइम आणि बसण्याच्या चुकीच्या स्थिती हे याचे प्रमुख कारण ठरत आहे.
सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस हा मानेच्या मणक्यांच्या घर्षणामुळे निर्माण होतो. या अवस्थेत हाडे आणि कुर्चा यांच्या मध्ये बिघाड झाल्याने मानेमध्ये अत्यंत वेदना होत असतात या चुकीच्या शारीरीक स्थितीमुळे आजूबाजूच्या नसा देखील दाबल्या जाऊ शकतात, ज्यामुळे सतत वेदना होतात आणि स्नायूंमध्ये कडकपणा येतो. मानदुखी, संवेदनशीलता, तीव्र वेदना आणि अस्वस्थता ही याची लक्षणे आहेत. जर वेळीच उपचार केले नाही तर यामुळे दीर्घकाळात शारीरीक हालचालींसंबंधी समस्या उद्भवू शकतात आणि जीवनाची गुणवत्ता देखील कमी होऊ शकते.
*अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील स्पाइन सर्जन डॉ. मोहित मुथा म्हणाले की,* एकाच स्थितीत बसून जास्त वेळ काम केल्यामुळे ३०-४५ वयोगटातील तरुणांमध्ये सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसच्या प्रमाणात सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, ज्यामुळे मणक्यावर जास्त ताण येतो. चुकीच्या शारीरीक स्थितीत जास्त वेळ बसल्याने पाठीचे स्नायू कमकुवत होतात आणि मणक्याची झीज होऊ लागल्यानंतर मणक्यामध्ये रचनात्मक बदल होऊ लागतात ज्यामुळे तेथील सांध्यांना सूज येणे, स्नायू कडक होणे, शिरा कडक होणे,शिरांवर दाब पडणे अशा समस्या उद्भवतात. योग्य शारीरीक हालचालीशिवाय तासनतास स्वयंपाकघरात काम करणे, दीर्घकाळ उभे राहणे हे देखील पाठीच्या कण्यावर ताण निर्माण करू शकते. नियमित स्ट्रेचिंगचा अभाव, चुकीची शारीरीक स्थिती आणि बैठी जीवनशैली ही समस्येला आणखी वाढवत आहे. दररोज, १० पैकी ५ लोक मानेच्या दुखण्याची तक्रार करतात आणि खराब शारीरीक स्थितीमुळे स्नायू कडक होतात आणि त्यांना ही स्थिती आढळून येते. या जोखमींबद्दल जागरूक रहा आणि स्थिती बिघडण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय करा.
*लीलावती रुग्णालयातील स्पाइन सर्जन डॉ. समीर रूपारेल म्हणाले की,* तरुणांमध्ये मणक्याच्या समस्या वाढत आहेत आणि त्यात १५% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. ३० ते ४० वयोगटातील तरुणांना कामाच्या ठिकाणी तासनतास बसून किंवा जास्त वेळ उभे राहिल्याने सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. दर महिन्याला, मला भेट देणाऱ्या १० पैकी २ ते ३ व्यक्तींना पाठदुखी आणि मानेच्या वेदना सतावतात. त्यांना सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसचा त्रास होतो. दीर्घकालीन मणक्याच्या समस्या टाळण्यासाठी दररोज व्यायाम करणे, नियमितपणे स्ट्रेचिंग करणे आणि योग्य पोश्चर राखणे गरजेचे आहे.
*डॉ. मुथा पुढे म्हणाले की,* सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसच्या उपचारांमध्ये दररोज व्यायाम, स्ट्रेचिंग, योग्य शारीरीक स्थिती राखणे आणि कधीकधी वेदना कमी करण्यासाठी औषधांचा समावेश करणे आवश्यक आहे. गंभीर प्रकरणांमध्ये पाठीच्या कण्यास इंजेक्शन किंवा शस्त्रक्रिया यासारख्या वैद्यकीय उपचारांची आवश्यकता भासू शकते. ही स्थिती टाळण्यासाठी आणि पाठीचा कणा निरोगी ठेवण्यासाठी, दररोज व्यायाम करा, स्ट्रेचिंग करा, जास्त वेळ बसून राहणे किंवा उभे राहणे टाळा, वारंवार ब्रेक घ्या, चालणे, वजन नियंत्रित राखणे वजन राखणे, स्वयंपाकघरात जास्त वेळ उभे राहणे टाळा आणि पाठीच्या कण्याला योग्य आधार देण्यासाठी कामाच्या ठिकाणी किंवा घरी योग्य खुर्ची व टेबलचा वापर करा जेणेकरुन तुम्हाला योग्य शारीरीक स्थिती राखता येईल व डेस्क आणि तुमच्या खांद्याचे अंतर योग्य राहिल.