उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान
देहूत ३७५ त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन वर्षपूर्ती सोहळ्याची सांगता

देहूत संत तुकाराम बीज सोहळ्या निमित्त भाविकांची गर्दी
देहू. श्री संत तुकाराम महाराज यांचा ३७६ व्या बीज सोहळा राज्य परिसरातून आलेल्या लाखो भाविक वारकरी यांच्या उपस्थितीत हरिनाम जयघोषात श्रींचे सदेह वैकुंठ गमन प्रसंगावर आधारित हभप बापूसाहेब मोरे महाराज देहूकर यांचे सुश्राव्य हृदयस्पर्शी कीर्तन सेवेने बीज सोहळा नामजयघोषात साजरा झाला. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, संजय महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, भानुदासमहाराज मोरे, अजय महाराज मोरे, योगीराज महाराज गोसावी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शरद सोनवणे, विजय बापू शिवतारे, माजी आमदार विलास लांडे, देहू नगरपंचायत नगराध्यक्षा पूजा दिवटे, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण यांचे सह राज्यातून आलेले मान्यवर महाराज, कीर्तनकार, प्रवचनकार, देवस्थानचे विश्वस्त आदी मान्यवर वारकरी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी पुरस्कार स्वीकारल्या नंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणाले, देहू नगरीत प्राप्त झालेला पुरस्कार हा माझा फक्त एकट्याचा नाही. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वाचा आहे. माझ्या कामावर प्रेम करणाऱ्या सर्व वारकऱ्यांचा, धारकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, माझ्या लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा, ज्येष्ठांचा अशा सर्वांचा आहे. आणि या पुरस्काराने माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. समाजाची सेवा अधिक प्रभावीपणे जोमाने करण्याची प्रेरणा मला यातून मिळाली अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यात श्री संत तुकाराम महाराज देवस्थान तर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने गौरविण्यात आले. ते पुढे म्हणाले, या वारकरी संप्रदायाबद्दल माझे मनात आदर आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देहू देवस्थानने मला त्यासाठी संस्थान ने योग्य समजले. हे माझ्या साठी फार भाग्याचे आहे. पुरस्कार दिल्या बद्दल मी संस्थानचा मनापासून आभारी आहे. वारकऱ्यांची देखील सेवा करण्याची संधी मला या पुरस्कारातून मिळाली आहे, म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट झालेली आहे. अशा पवित्र भूमीमध्ये हा पुरस्कार मला मिळतोय याच्या पेक्षा दुसरं भाग्य नाही. अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भंडारा डोंगर येथील भव्य दिव्य सप्ताहास देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सद्दीच्छा भेट देऊन सोहळ्यात संवाद साधला. निघोजे येथे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलेश पवार यांचे नूतन पंपाचे उदघाटनास भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध पक्षाचे मान्यवर उपस्थित होते. यावेळी देहू नगरपंचायत यांचे वतीने नगराध्यक्षा पूजा दिवटे, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत व सत्कार केला. देहू येथील संदेश वैकुंठगमन स्थान मंदिर येथील नंदुरकीचे वृक्ष प्रांगणात हभप. बापूसाहेब महाराज मोरे देहूकर यांचे बीज सोहळ्यात हरिनाम गजरात सुश्राव्य कीर्तन झाले. यावर्षी श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन ३७५ वर्षपूर्ती सोहळ्याची सांगता मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात झाली. यावेळी मंदिर परिसरात लक्षवेधी पुष्प सजावट आणि विद्युत रोषणाई कार्यात आली होती. यावर्षी सोहळ्यात सुमारे ८ लाखावर भाविकांची उपस्थिती असल्याचे देहूतील भाविक शंकरराव हगवणे यांनी सांगितले. देहू नगरपंचायत, देहू देवस्थान, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, आरोग्य सेवा प्रशासन, सार्वजनिक बस वाहतूक प्रशासन यांनी सुसंवाद ठेवत सोहळ्याचे नियोजन केले. यामुळे नागरी सेवा सुविधा प्रभावी राहिल्याचे माऊली घुंडरे पाटील यांनी सांगितले. यावर्षी बीज सोहळ्यास प्रचंड गर्दी झाल्याने आळंदी देहू रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. मात्र वाहतूक पोलीस प्रशासनाने परिश्रम पूर्वक वाहतूक सुरळीत केली.
देहूत संत तुकाराम बीज सोहळ्या निमित्त भाविकांची गर्दी,हरिनाम गजरात भाविकांचे दर्शन
देहू – येथील संत तुकाराम महाराज बीज सोहळ्या निमित्त देहूत तसेच आळंदीत देखील भाविकांची संत तुकाराम महाराज मंदिरासह आळंदी मंदिरात श्रींचे दर्शनास हरिनाम गजरात भाविकांनी गर्दी केली आहे.
देहूत रविवारी ( दि. १६ ) लाखो भाविकांचे उपस्थित संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा साजरा झाला. देहूत इंद्रायणी नदी घाट परिसरासह श्रीक्षेत्र देहूत विविध ठिकाणी बीज सोहळया निमित्त हरिनाम गजरात धार्मिक कार्यक्रम परंपरेने झाले. कीर्तन, प्रवचन, गाथा भजन, गाथा पारायण आदी धार्मिक कार्यक्रमांसह अन्नदान मोठ्या प्रमाणात करण्यात आले. मंदिरात भाविकांनी रांगा लावून श्रीचे दर्शन घेतले. ज्ञानोबा – माऊली तुकाराम नामजयघोष करीत भाविकांनी दर्शन घेत जयघोष केला.
इंद्रायणी नदी घाटावर, संत तुकाराम महाराज मंदिर, गाथा मंदिर आणि श्री वैकुंठ गमन स्थान मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नानास गर्दी केली असून तीर्थक्षेत्री स्नान माहात्म्य जोपासले जात आहे. देहू नगरपंचायतीने विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या असून पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, स्वच्छता प्रभावी पणे उपलब्ध करून दिल्या आहेत. देहूत सीसीटीव्हि यंत्रणा तसेच पब्लिक ऍड्रेस सिस्टएम प्रभावी पणे विकसित केली असून भाविक नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, नगराध्यक्षा पूजा दिवटे यांनी घेतली. यासाठी नगरपंचायत पदाधीकारी, महसूल, आरोग्य सेवा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि देहू देवस्थान यांनी सुसंवाद ठेवून नियोजन केले आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून भाविक आणि मंदिर परिसरात सुरक्षितता राहण्याचे दृष्टीने पोलीस तसेच पोलीस मित्र कार्यरत आहेत. घाटावर तसेच मंदिरात भाविकांनी रांगा लावून श्रीचे दर्शन घेतले. देहू परिसरात महिला, पुरुष भाविकांचे गर्दीने रस्ते फुलले होते. मंदिरात प्रभावी दर्शन व्यवस्थेने भाविकांचे सुलभ दर्शन झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. इंद्रायणी नदी घाटावर देखील भाविकांनी गर्दी केली होती. मंदिर प्रदक्षिणा हरिनाम गजरात भाविकांनी केल्या. भाविक मिळेल त्या वाहनाने तसेच खाजगी वाहनाने ये-जा करताना दिसत होते. पुणे महानगर परिवहन सेवेने देखील भाविकांची व्यवस्था केली होती. यात राज्य परिवहन सेवेने प्रवासी बस सेवा उपलब्द्ध करून दिल्या होत्या. ध्वनिक्षेपकांवरून महिलांना चोरांपासून सावध राहण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. देहू, आळंदी, पंढरपूर देवदर्शन करून काही भाविक यात्रा करीत असतात. या वर्षीही राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भाविकांना कमी वेळेत सुरक्षित, सुरळीत दर्शन व्यवस्था आणि भाविकांची सुरक्षा यावर विशेष लक्ष देण्यात आल्याचे कनिष्ठ अभियंता संघपाल गायकवाड यांनी सांगितले. शांतता आणि प्रभावी पोलीस बंदोबस्त यासाठी पोलीस आयुक्तालयाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.