पुणे. हडपसर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत निवडणूक कामकाजाकरीता नियुक्त सेक्टर अधिकारी, सहाय्यक सेक्टर अधिकारी व इतर अधिकारी तसेच निवडणूक केंद्रावरील अधिकाऱ्यांसाठी ईव्हीएम हाताळणीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
महानगरपालिकेच्या विठ्ठल तुपे नाटयगृहात आयोजित प्रशिक्षणावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नागनाथ भोसले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शैलजा पाटील, महेश सुधळकर, प्रशिक्षण समन्वय अधिकारी रवी आयवळे, सहाय्यक समन्वय अधिकारी नितीन सहारे, नायब तहसीलदार जाई कोंडे आदी उपस्थित होते.
कल आणि आज (रविवारी) दोन सत्रात आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणात इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या वापराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मोरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री.सुधळकर यांनी मतदान यंत्राबाबत अत्यंत सोप्या भाषेत माहिती दिली व प्रात्यक्षिक करून दाखवले. या प्रशिक्षण सत्रामध्ये प्रत्येक मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी मतदान यंत्रे स्वतः हाताळली व त्या संबंधीची सर्व माहिती प्रात्यक्षिकांच्या आधारे करुन घेतली. प्रशिक्षणाला सर्व अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच हाताळणीसंदर्भात शंकाचे निरसन करून घेतले.
निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास गैरहजर राहू नये, गैरहजर राहिल्यास लोकप्रतिनिधी कायदा १९५१ मधील कलम १३४ अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल असे डॉ.मोरे यांनी सांगितले.