पुणे. पुणे शहरातील नागरिक भाजप आणि महायुतीच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळले आहेत. भाजपमुळे तीन वर्षे महापालिकेची निवडणूक झालेली नाही. भाजपने पक्ष फोडल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड रोष असून
शहरात महाविकास आघाडी आठही जागा जिंकणार आहे, असा विश्वास महाविकास आघाडीतील नेत्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
काँग्रेस भवन येथे सोमवारी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यावेळी उपस्थित होते. काँग्रेस भवन येथे दररोज पत्रकार परिषदांचे आयोजन तसेच प्रचाराचे नियोजन केल्याबद्दल काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा महंमद यांचा अंकुश काकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिंदे, काकडे आणि मोरे यांनी प्रचाराचा आढावा घेऊन महाविकास आघाडीच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला.
शिंदे म्हणाले, शहरात भाजपचे आमदार , मंत्री असतानाही भाजपच्या उमेदवारांना प्रचारासाठी राज्यातील आणि देशातील नेत्यांवर अवलंबून राहावे लागले. महायुती सरकारची एकही योजना पूर्ण झालेली नाही. बटेंगे तो कटेंगे , असे मुद्दे पुण्यात चालले नाहीत. भाजपचा एकही नेता महागाई, बेरोजगारविषयी बोलला नाही. भाजपकडे विकासाचा मुद्दा नव्हता. भाजपने प्रचाराची पातळी सोडली. आम्ही प्रचाराची पातळी सोडली नाही.
काकडे म्हणाले, हडपसर आणि वडगाव शेरीमधील महायुतीच्या उमेदवाराला गद्दारीचे फळ मिळेल. महायुती सरकारने महाविकास आघाडीच्या प्रचारावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हेलिकॉफ्टर उड्डाणाला अनेकवेळा परवानगी नाकारली. यामुळे अनेक ठिकाणच्या सभा रद्द झाल्या. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने सरकारी यंत्रणेचा मोठा गैरवापर केला. भाजपने दोन पक्ष फोडले हे लोक विसरलेले नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे. फडणवीस यांना ही भाषा शोभत नाही. पृथ्वीराज चव्हाण हे राज्यातील सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्याबद्दल काय बोलतो याचे भान बाळगणे गरजेचे होते. भाजप आणि महायुतीच्या या घाणेरड्या राजकारणाला लोक कंटाळले आहेत. शहरातील आठ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील. राज्यात जास्तीत जास्त जागा मिळवून महाविकास आघाडीचे सरकार येईल.
मोरे म्हणाले, महायुतीच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी सतत आचारसंहितेचा भंग केला. त्यावर आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली तरी कारवाई झाली नाही. आमच्याकडून थोडी कुठे चूक झाली की लगेच कारवाई करण्यात आली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हेलिकॉफ्टर उड्डाणाला अनेकवेळा परवानगी नाकारली. यामुळे अनेक ठिकाणच्या सभा रद्द झाल्या. पूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात आम्ही विरोधी बाकांवर होतो. काँग्रेसने शिवसेनेला कधीही अशी वागणूक दिली नाही, असे ते म्हणाले.