ताजा खबरब्रेकिंग न्यूज़महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याकरीता येणाऱ्या अनुयायींना उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात -उपमुख्यमंत्री

Spread the love

 

 

पुणे. पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२५ रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याकरीता येणाऱ्या अनुयायींची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा याकरीता सर्व संबंधित विभागांनी उत्तम नियोजन करावे, याकरीता शासनाच्यावतीने निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

हवेली तालुक्यातील मोजै पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत आयोजित प्रशासकीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पिंपरी चिंचवडचे पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा बार्टीचे महासंचालक सुनील वारे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बप्पा बहीर आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, येत्या १ जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या लक्षात घेता त्यादृष्टीने सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन करावे. गतवर्षीच्यावेळी राहिलेल्या त्रुटींची पूर्तता होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही याकरीता वाहतूक व्यवस्था, वाहनतळाचा आराखडा तयार करावा, स्वच्छतेसाठी पथकांची नियुक्ती आणि स्वच्छतागृहांसाठी पुरेशा प्रमाणात पाण्याची सुविधा करावी. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची संख्याही विचारात घ्यावी.

 

पोलीस विभागाने वाहतुकीचे नियोजन करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन करावे. पीएमपीएमएलने पुरेशा बसेसची व्यवस्था करावी. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्त्यांची डागडुजी करून घ्यावी. अनुयायांची संख्या लक्षात घेऊन सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांही सुलभरित्या विजयस्तंभास अभिवादन करता येईल, याबाबत दक्षता घ्यावी. रुग्णवाहिका, प्रथमोपचार पेटी पुरेशा प्रमाणात ठेवाव्यात. एकंदरीत अभिवादन सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित विभागाने समन्वयाने कामे करावीत, अशाही सूचना श्री. पवार म्हणाले.

 

बैठकीपूर्वी श्री. पवार यांनी विजयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

पाटील म्हणाले, विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याकरीता येणाऱ्या अनुयायांची संख्या विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाच्यावतीने सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त यांनी स्वतः विजयस्तंभ परिसराला भेट देवून आढावा घेतला आहे. त्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येत आहे. विविध संघटनेच्या प्रतिनिधी सोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन त्यांच्या सूचनाही विचारात घेतल्या जात आहेत, अभिवादन सोहळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.

यावेळी विजयस्तंभ परिसराचे सुशोभिकरण, प्रकाशव्यवस्था, स्टॉल, मंडप उभारणी, वाहनतळ, वाहतूक आराखडा, आरोग्य सुविधा, भोजनव्यवस्था, पिण्याचे पाणी, रस्त्यांची दुरुस्ती, तात्पुरते शौचालय उभारणी, स्वच्छतेसाठी घंटागाड्या, स्वच्छता, आपत्तकालीन प्रसंगी अग्नीशमन वाहनांची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, हिरकणी कक्ष, आपत्ती व्यवस्थापन आदींबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस पुणे शहरच्या उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे, हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगरपालिका, पीएमआरडीए अग्नीशमन विभाग, जिल्हा परिषद, पोलीस विभाग, पीएमपीएमएल, आरोग्य विभाग, राज्य उत्पादन शुल्क आदी विभागांचे अधिकारी तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button